मुंबई, दि. 29 - जर तुम्हाला तुमचं ट्विट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचं असेल, म्हणजे अनोळखी लोकांच्याही टाईमलाईनवर ते दिसावं असं वाटत असेल तर ते आता शक्य होणार आहे. यासाठी ट्विटर एक नवी योजना आणत असून याचा अनेकांना फायदा होणार आहे. ट्विटरच्या नव्या योजनेनुसार यासाठी प्रतिमहिना 99 डॉलर्स म्हणजेच जवळपास 6,350 रुपयांची मेंम्बरशिप घ्यावी लागणार आहे. ही मेम्बरशिप घेतल्यानंतर ट्विटर तुमचं ट्विट व्हायरल करण्यासाठी मदत करणार आहे. सध्या याची चाचणी सुरु आहे. मात्र ही मेम्बरशिप सर्वांसाठी उपलब्ध असणार नाही. ज्यांची निवड ट्विटरकडून करण्यात येईल त्यांनाच ही सुविधा मिळणार आहे.
ट्विटरने शुक्रवारी एक ब्लॉग पोस्ट करत सांगितलं आहे, जाहिरातीसाठी वेगळं ट्विट करण्याची गरज नाही. याआधी ज्याप्रमाणे तुम्ही ट्विट करत होता, तसंच साध्या पद्धतीने ट्विट करायचं आहे. त्यामध्ये लिंक, टॅग वैगेरे करु शकता. यानंतर ट्विटर स्वत:हून तुमच्या ट्विटची जाहिरात करण्यास सुरुवात करेल.
अनेक लोकांना किंवा छोट्या कंपन्यांना आपली जाहिरात करायची असते. मात्र यासाठी सोशल मीडियावर जास्त पैसे खर्च करणं त्यांना परवडणार नसतं. अशा लोकांसाठी आणि छोट्या कंपन्यांसाठी ट्विटर ही योजना आणत आहे.