झोपो कंपनीने इन्फीनिटी डिस्प्ले असणारे फ्लॅश एक्स १ आणि फ्लॅश एक्स २ हे दोन स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना सादर करण्याची घोषणा केली आहे. सॅमसंगसह अन्य कंपन्यांच्या काही फ्लॅगशीप मॉडेल्समध्ये इन्फीनिटी डिस्प्ले देण्यात आलेला आहे. याचीच कॉपी करत झोपो फ्लॅश एक्स १ आणि फ्लॅश एक्स २ हे दोन स्मार्टफोन बाजारपेठेत उतारण्यात आले आहेत. यात कडा विरहीत १८:९ गुणोत्तर असणारा डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. यात स्क्रीन टू बॉडी हे गुणोत्तर तब्बल ८३ टक्के इतके असल्यामुळे या दोन्ही मॉडेल्सचा लूक अगदी उच्च श्रेणीतील स्मार्टफोनप्रमाणेच वाटतो. हे दोन्ही स्मार्टफोन अनुक्रमे ६,९९९ आणि ८,९९९ रूपये मूल्यात ग्राहकांना देशभरातील शॉपीजमधून खरेदी करता येणार आहेत.
फिचर्सचा विचार केला असता, झोपो फ्लॅश एक्स १ आणि एक्स २ या मॉडेलमध्ये ६४० बाय १२८० आणि ७२० बाय १४४० पिक्सल्स क्षमतांचे अनुक्रमे ५.५ व ५.९९ इंच आकारमानाचे डिस्प्ले असतील. झोपो फ्लॅश एक्स १ या मॉडेलमध्ये ६४ बीट क्वॉड-कोअर मीडियाटेक एमटी ६७३७ प्रोसेसर असेल. याची रॅम दोन जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा असेल. तर यात सोनी आयएमएक्स२१९ सेन्सर व एफ/२.४ अपार्चरयुक्त ८ मेगापिक्सल्सचा मुख्य तर एफ/२.२ अपार्चरयुक्त ५ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा असेल. तर यातील बॅटरी २५०० मिलीअँपिअर क्षमतेची असेल.
झोपो फ्लॅश एक्स २ या मॉडेलमध्येही क्वॉड-कोअर मीडियाटेक एमटी ६७३७ प्रोसेसर असून याचीही रॅम दोन जीबी व इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते वाढविण्याची सुविधा असेल. यातील कॅमेरेदेखील झोपो फ्लॅश एक्स १ या मॉडेलप्रमाणेच असतील. तर बॅटरी मात्र ३३८० मिलीअँपिअर क्षमतेची असेल. या दोन्ही मॉडेलमध्ये फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. तर यात अॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत.