हॅकर्सपासून वाचण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी हॅकर्स पुन्हा नवनवीन मार्ग शोधतात. असाच एक धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे. टायपिंगच्या आवाजावरून सिस्टम हॅक केली जात असल्याचं उघड झालं आहे. याआधी हॅकिंगच्या या पद्धतीबद्दल ऐकलं नसेल, पण असं होऊ शकतं. एका नव्या रिपोर्टमध्ये ही बाब समोर आली आहे.
तुमच्या कॉम्प्युटरवर किंवा लॅपटॉपवर पासवर्ड टाइप करताना तुम्ही स्क्रीन आणि कीबोर्ड कोणी पाहू नये म्हणून दुसऱ्यांपासून वाचवू शकता, पण आवाजाचं काय? ZDnet च्या रिपोर्टनुसार, हॅकर्स एका खास तंत्रज्ञानाचा वापर करून कीबोर्डच्या आवाजाने तुमचा पासवर्ड क्रॅक करू शकतात.
हॅकिंगचा नवा मार्ग काय आहे?
आपला पासवर्ड कोणीतरी गुपचूप पाहेल याची आपल्याला अनेकदा काळजी वाटते, पण पासवर्ड ऐकण्याकडे आपलं लक्ष कधीच जात नाही. हॅकिंगच्या या पद्धतीला Acoustic Side-Channel Attack म्हणतात. पासवर्ड हॅकिंगच्या या प्रकारात तुमच्या कीबोर्डमधून बाहेर पडणाऱ्या आवाजावर लक्ष केंद्रित केलं जातं.
हॅकर्स आवाजाचे विश्लेषण करून तुमच्या सिस्टमचा पासवर्ड क्रॅक करतात. यासाठी त्यांना एक प्रगत साधन वापरावे लागेल, जे तुम्ही टाइप केलेली नेमकी अक्षरे आणि अंकांची माहिती देते. हा धोका किती मोठा आहे, हे समजून घेण्यासाठी तज्ज्ञांच्या टीमने प्रयोग केला. त्यांनी MacBook Pro 16-इंचाचा वापर केला, जो एक शक्तिशाली लॅपटॉप आहे.
आयफोन 13 मिनी लॅपटॉपपासून त्यांनी काही अंतरावर एका मऊ कापडावर ठेवला, जेणेकरून आवाज पकडता येईल. याशिवाय लॅपटॉपचे रेकॉर्डिंग फंक्शनही वापरलं. यानंतर, हा सर्व डेटा एआय आधारित स्मार्ट कॉम्पुटर प्रोग्राम शिकवण्यासाठी वापरला गेला, ज्याचे काम टायपिंग आवाजांचे निरीक्षण करणे आहे.
ही पद्धत 95% पर्यंत कार्य करते
प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर, या एआय प्रोग्रामची चाचणी घेण्यात आली आहे. चाचणीमध्ये, हा प्रोग्राम कोणत्या बटणाचा आवाज आहे हे अगदी सहजपणे शोधतो. अहवालानुसार, ते 95 टक्क्यांपर्यंत अचूक प्रिडिक्ट करतो.
संशोधकांनी हे टाळण्याचा मार्गही शोधून काढला आहे. त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. संशोधकांना असे आढळून आले आहे की आपण या प्रोग्रामची सहज फसवणूक करू शकतो. यासाठी तुम्हाला तुमच्या टायपिंगमध्ये बदल करावा लागेल. शिफ्टचा वापर करून टाइप करू शकता, यामुळे प्रोटेक्शन मिळेल. तुम्ही व्हिडीओ कॉलवर असल्यास, तुम्ही पार्श्वभूमी आवाज जोडू शकता, जेणेकरून AI टूल तुमचा टायपिंग आवाज योग्यरित्या डीकोड करू शकणार नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.