ओला, उबर सारख्या अॅप आधारित टॅक्सी कंपन्या कधी किती दर आकारतील नेम नाही. एखाद्या दिवशी तुम्हाला ते १०० रुपयांत नेऊन सोडतील, तर दुसऱ्याच दिवशी तुम्हाला त्याच प्रवासासाठी 200-300 रुपयेही आकारले जातात. अँड्रॉईड आणि आयफोन युजरलाही वेगवेगळे दर दाखविले जात असल्याचे काहींनी निदर्शनास आणले होते. आता तर उबर मोबाईलच्या बॅटरीनुसार दर दाखवत असल्याचे एकाने निदर्शनास आणले आहे.
या निरीक्षणात रिषभ सिंग नावाच्या तरुणाने केवळ आयफोन आणि अँड्रॉईडच नाही तर वेगवेगळ्या मोबाईलवर शिल्लक असलेल्या बॅटरीच्या परसेंटेजवर दर कसे वेगवेगळे दाखविले जातात हे सांगितले आहे. याचा फोटो आणि त्याची निरीक्षणे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावर युजर तऱ्हेतऱ्हेच्या प्रतिक्रिया देत आहेत. तसेच कॅब प्रोव्हायडरकडून आलेले अनुभव सांगत आहेत.
सिंग यांनी दोन आयफोन आणि अँड्रॉईड फोन वापरले आहेत. यामध्ये त्यांनी वेगवेगळे दर दाखविण्यामागचे गणित सांगितले आहे. हे सर्व बॅटरी परसेंटेजवर आधारित आहे. या निरीक्षणात आपण दोन शॉकिंग गोष्टी दाखवत आहे. जे उबर घेत असलेले भाडे प्रभावित करते.
अँड्रॉइड आणि आयओएस डिव्हाइसमधील दाखवत असलेल्या दरात खूप मोठा फरक होता.समान खाते, ठिकाण आणि वेळ असूनही दर वेगवेगळे दाखविले जात होते. वेगवेगळ्या मोबाईलवर "१३% सूट" किंवा "५०% सूट" सारख्या सवलती दाखवत होते.
तसेच कमी बॅटरी लेव्हल असलेल्या मोबाईलवर जास्त भाडे दाखवले जात होते. तर जास्त बॅटरी चार्ज असलेल्या मोबाईलवर कमी भाडे दाखविले जात होते. कमी बॅटरी लेव्हल असलेल्या ग्राहकांना लवकर कुठेतरी पोहोचायचे असते. यामुळे ते मिळेल त्या दराने कॅब बुक करतात. त्यांची गरज ओळखून उबरचा अल्गोरिदम तसे करत असल्याचा दावा सिंग यांनी केला आहे.