नवी दिल्ली : भारतीयांना आधार कार्डने एक वेगळी ओळख दिली आहे. या आधारमध्ये बोटाचे ठसे, डोळ्यांचे रेटिना असल्याने हे ओळखपत्र खूप महत्वाचे मानले गेले आहे. सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनही अनेक ठिकाणी आधार बंधनकारक करण्यात आले आहे. आता युआयडीएआयने आधार कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. फक्त ५० रुपयांत आधारमध्ये हवे तेवढे बदल करता येणार आहेत.
आधार कार्डमध्ये पत्ता, नाव, जन्म तारीख, फोटो आदी बदलासाठी पैसे द्यावे लागतात. पत्ता बदलण्यासाठी 150 रुपयेही आकारले जात होते. यामुळे युआयडीएआयने ट्विट करून फीची माहिती दिली आहे. तसेच या बदलांसाठी जर कोणी तुमच्याकडे जास्त पैसे मागत असेल तर त्याची तक्रार तुम्ही टोल फ्री क्रमांक किंवा ऑनलाईन करू शकता, असेही सांगितले आहे.
UIDAI ने सांगितले की एकावेळी तुम्ही एक किंवा त्यापेक्षा अधिक बदल करणार असाल तरीही तुम्हाला 50 रुपयेच शुल्क द्यावे लागेल. यापेक्षा जास्त पैसे भरू नका.
Aadhaar@UIDAI वरून ट्विट करण्यात आले असून जर कोणी जास्त पैसे आकारत असेल तर त्याची तक्रार हेल्पलाईन 4747 वर किंवा https://resident.uidai.gov.in/file-complaint य़ेथे करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
आधार कार्ड रिप्रिंटसाठी 50 रुपये आकारले जातात. यामध्ये प्रिंट, स्पीड पोस्टाचा खर्च आणि जीएसटीची रक्कम असते. हे शुल्क तुम्ही ऑनलाईनही करू शकता. यासाठी नेट बँकिंग, डेबिट, क्रेडीट कार्ड आणि युपीआयही वापरू शकता.