खरं तर बहुतांश कंपनी आपल्या आगामी मॉडेलच्या आगमनाआधी चांगलीच ‘हवा’ तयार करत असतात. यासाठी अनेक लीक्स आणि टीझर्सच्या माध्यमातून उत्सुकता चाळवली जाते. मात्र याच्या अगदी विरूद्ध बाजूने असुस कंपनीने कोणताही गाजावाजा न करता पेगासुस ४एस स्मार्टफोनचे अनावरण केले आहे. याची असुस कंपनीने आपल्या संकेतस्थळावर लिस्टींग केली आहे. यात याच्या छायाचित्रासह सर्व फिचर्सला दर्शविण्यात आले आहेत. मात्र याचे मूल्य आणि उपलब्धता याबाबत काहीही माहिती देण्यात आलेली नाही. अर्थात येत्या काही दिवसांमध्ये याला अधिकृतपणे लाँच करतांना या सर्व बाबींची माहिती देण्यात येईल असे मानले जात आहे.
असुस पेगासुस ४एस या मॉडेलमध्ये ५.७ इंच आकारमानाचा आणि ७२० बाय १४४० पिक्सल्स म्हणजेच एचडी प्लस २.५ डी हा डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा अस्पेक्ट रेशो १८:९ असा आहे. यात मीडियाटेक एमटी६७५० टी हा प्रोसेसर असेल. याचे ३ जीबी रॅम/३२ जीबी स्टोअरेज आणि ४जीबी रॅम/६४ जीबी स्टोअरेज असे दोन व्हेरियंट सादर करण्यात येणार आहेत. दोन्ही व्हेरियंटमध्ये मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने स्टोअरेज वाढविण्याची व्यवस्था असेल. यात ड्युअल कॅमेरा सेटअप असेल.
याच्या मागील बाजूस १६ व ८ मेगापिक्सल्स क्षमतांचे दोन कॅमेरे असतील. यात एलईडी फ्लॅश आणि ऑटो-फोकसची सुविधा देण्यात आली आहे. हा कॅमेरा फुल एचडी क्षमतेचे व्हिडीओ चित्रीकरण करू शकेल. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात ८ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा असेल. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारा असून यात तब्बल ४०३० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.