ओप्पो कंपनीने ए७५ आणि ए७५एस हे दोन नवीन स्मार्टफोन जागतिक बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून याचे नुकतेच अनावरण करण्यात आले आहे.
ओप्पो ए७५ व ए७५एस या दोन्ही मॉडेल्समध्ये स्टोअरेजच्या क्षमतेचा अपवाद वगळता अन्य सर्व फिचर्स समान आहेत. ओप्पो ए७५ या मॉडेलमध्ये ६ इंच आकारमानाचा, फुल एचडी प्लस (१०८० बाय २१६० पिक्सल्स) क्षमतेचा आणि एलसीडी या प्रकारचा डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा अस्पेक्ट रेशो १८:९ असा आहे. यात मीडियाटेक हेलिओ पी२३ हा प्रोसेसर देण्यात आला आहे. याची रॅम ४ जीबी व स्टोअरेज ३२ जीबी आहे. तर ओप्पो ए७५एस मॉडेलची रॅम ४ जीबी व स्टोअरेज ६४ जीबी असेल. या दोन्ही व्हेरियंटचे स्टोअरेज मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने २५६ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे.
या दोन्ही स्मार्टफोनमध्ये एलईडी फ्लॅशसह १६ मेगापिक्सल्सचा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी २० मेगापिक्सल्स क्षमतेचा कॅमेरा असेल. दोन्ही मॉडेल्समध्ये ३,२०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. तर हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर आधारित कलर ओएस ३.२ या प्रणालीवर चालणारा असेल. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. तर यात अॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत.
पहिल्यांदा हे स्मार्टफोन तैवानमधील ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले आहेत. भारतीय चलनानुसार यांचे मूल्य २३ ते २५ हजारांच्या दरम्यान आहे. लवकरच अन्य राष्ट्रांमध्येही याला लाँच करण्यात येईल असे मानले जात आहे.