नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांपासून डिजिटल व्यवहार मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत. भीम, पेटीएम, Google Pay, PhonePe यांसारख्या युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस अर्थात UPI अॅप्सच्या वापरात लक्षणीय वाढ झालेली आहे. मात्र, नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. यामध्ये पुढील काही दिवस यूपीआय पेमेंट्स सेवेत अडचणी येऊ शकतील, असे सांगण्यात आले आहे.
NPCI कडून एक ट्विट करण्यात आले आहे. त्यात, पुढील काही दिवस मध्यरात्री १ ते ३ या कालावधीत यूपीआय पेमेंट्स सेवेमध्ये समस्या जाणवू शकते. पुढील काही दिवस ही समस्या जाणवेल. युझर्सनी त्यानुसार आपल्या व्यवहारांचे नियोजन करावे, अशी माहिती NPCI कडून देण्यात आली आहे. यादरम्यान सिस्टिम अपग्रेडचे काम केले जाणार आहे, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे.
सिस्टिम अपग्रेडेशनसाठी किती दिवस लागतील आणि नेमके किती दिवस ही समस्या युझर्सना जाणवेल, याबाबत NPCI कडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, युझर्सनी योग्य ती खबरदारी घेऊनच व्यवहार करावेत, असे सांगितले जात आहे.
दरम्यान, नवीन वर्षापासून यूपीआय पेमेंट्सवर शुल्क आकारणी करण्यात येणार असल्याच्या बातम्या देण्यात आल्या होत्या. मात्र, या सर्व बातम्या चुकीच्या असून, यूपीआय पेमेंट्सवर कोणतेही शुक्ल आकारले जाणार नाही. युझर्सनी सहजसोप्या पद्धतीने UPI व्यवहार सुरू ठेवावेत, असे NPCI ने स्पष्ट केले होते.