नवी दिल्ली - कोरोना काळात डिजिटल पेमेंटचा वापर हा आता प्रत्येकजण करत आहे. डिजिटल पेमेंट पर्यायामुळे व्यवहार करण्यात खूप मोठी मदत झाली. लोक खरेदीसाठी डिजिटल पेमेंटचा अवलंब करतात. कारण, मोबाईल वापरून UPI पेमेंट करणं सोपं आहे. UPI पेमेंट पर्यायासह, तुमच्या खिशात पैसे ठेवण्याची गरज संपलीच आहे. स्मार्टफोनच्या मदतीने तुम्ही मोठ्या मॉल्सपासून ते छोट्या किराणा दुकानामध्ये याच्या माध्यमातून खरेदी करू शकता.
कधी घाईगडबडीत जर तुमचा मोबाईल कुठेतरी हरविला आणि तो चुकीच्या व्यक्तीच्या हाती गेला तर ते तुमचे Bank Account देखील रिकामे करू शकतात. म्हणूनच UPI Payments वापरताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. तुमचा फोन चोरीला गेल्यास किंवा हरवल्यास तुम्ही UPI खाते सहजपणे कसे डीएक्टीव्हेट करू शकता हे जाणून घेऊया.
फोन चोरीला गेल्यास किंवा हरवल्यास, सर्वप्रथम तुमच्या मोबाइल नेटवर्कच्या कस्टमर केअर एक्झिक्युटिव्हला कॉल करा आणि तुमचा मोबाइल नंबर आणि सिम त्वरित ब्लॉक करण्यास सांगा. एक्झिक्युटिव्ह तुमचा मोबाइल नंबर वापरून UPI पिन तयार करणे प्रतिबंधित करेल. सिम ब्लॉक करण्यासाठी, कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह तुम्हाला तुमचे संपूर्ण नाव, बिलिंग पत्ता, शेवटचे रिचार्ज तपशील, ईमेल आयडी इत्यादी तपशील विचारू शकतात.
तुम्हाला तुमच्या बँकेच्या हेल्पलाइन नंबरवर कॉल करून तुमचे बँक खाते ब्लॉक करण्यास आणि UPI सेवा बंद करण्यास सांगावे लागेल. यानंतर तुम्हाला हरवलेल्या फोनसाठी एफआयआर नोंदवावा लागेल, याचा वापर करून तुम्ही तुमचे सिम आणि बँकिंग सेवा नंतर पुन्हा सुरू करू शकता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.