व्हाटसअॅप या मॅसेंजरवर अखेर युपीआय या केंद्राच्या प्रणालीवर आधारित पेमेंट सिस्टीम येणार असल्याचे स्पष्ट झाले असून यासोबत बहुप्रतिक्षित रिकॉल हे फिचर अंतिम टप्प्यात असल्याचेही संकेत मिळाले आहेत. व्हाटसअॅपवरील नवीन फिचर्सबाबत युजर्सला नेहमीच मोठ्या प्रमाणात उत्सुकता असते. यातील काही फिचर्स हे व्हाटसअॅपच्या वापराला आमूलाग्र बदलून टाकणार्या असल्यामुळे ते कधी येणार ? याची चर्चा सुरू असते. यातील दोन बहुप्रतिक्षित फिचर्स म्हणजे पेमेंट सिस्टीम आणि रिकॉल हे फिचर होय. यातील रिकॉल या फिचरच्या मदतीने व्हाटसअॅपवर पाठविलेला संदेश परत घेण्याची अर्थात समोरच्या व्यक्तीला चुकीने पाठविला असल्यास होणारी अवघडलेली स्थिती यातून टाळता येणार आहे. या फिचर्सची चाचणी अनेक दिवसांपासून घेण्यात येत असली तरी अद्याप ते प्रत्यक्षात वापरासाठी मिळालेले नाही. या पार्श्वभूमिवर अँड्रॉइडच्या २.१७.२९५ आणि त्या पाठोपाठ २.१७.२९७ या दोन बीटा म्हणजेच प्रयोगात्मक स्थितीत असणार्या आवृत्त्या नुकत्याच सादर करण्यात आल्या आहेत. यात रिकॉल या फिचरचा समावेश करण्यात आलेला नाही. तथापि, ही सुविधा लवकरच मिळू शकते असे संकेत मिळाले आहेत.
दरम्यान, या आवृत्तीत असणार्या ‘हिडन प्रिव्ह्यू’च्या माध्यमातून यात डिजीटल पध्दतीने पेमेंट सिस्टीमची सुविधा देण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या संदर्भात @WABetaInfo या ट्विटर अकाऊंटने सविस्तर माहिती दिली आहे. यात ‘द इमिजिएट बँक टू बँक ट्रान्सफर विथ युपीआय’ हा उल्लेख आढळून आला आहे. म्हणजेच यात भारत सरकारने विकसित केलेल्या युपीआय या पेमेंट प्रणालीवर आधारित डिजीटल मनी ट्रान्सफर करणे शक्य होणार असल्याचा दावा या अकाऊंटवरून करण्यात आला आहे. तर दुसर्या म्हणजेच २.१७.२९७ या आवृत्तीत प्रतिमांवर विविध प्रकारचे फिल्टर्स लाऊन ते शेअर करण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. अलीकडेच हे फिचर आयओएस आवृत्तीच्या युजर्ससाठी देण्यात आले आहेत. आता हीच सुविधा अँड्रॉइडच्या युजर्सलादेखील मिळणार आहे. पहिल्यांदा हे फिचर बीटा आवृत्तीत आले असल्यामुळे ज्यांनी यासाठी नोंदणी केलेली आहे त्यांनाच याला वापरता येणार आहे. तर येत्या काही आठवड्यांमध्ये ते सर्व युजर्सला वापरता येईल.