WhatsApp ने काही दिवसांपूर्वी आपल्या प्रायव्हसी पॉलिसीमध्ये महत्त्वपूर्ण बदल केला. त्यानंतर भारतासह जगभरातून WhatsApp च्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीविरोधात सूर उमटू लागला होता. यानंतर अनेकांनी WhatsApp ला रामराम ठोकत सिग्नल आणि टेलिग्राम या अॅप्सच्या बाजूनं आपला मोर्चा वळवला आहे. याचदरम्यान गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या चर्चेवर सिग्नल या अॅपचे कार्यकारी अध्यक्ष ब्रायन अॅटन यांनी आपले विचार व्यक्त केले आहेत. ज्या प्रकारे भारतीय WhatsApp सोडत आहेत त्यावरून भारतीयांसाठी प्रायव्हसी किती महत्त्वपूर्ण आहे दिसून येत असल्याचं ते म्हणाले.ब्रायन अॅटन हे WhatsApp चे सह-संस्थापकही होते. फेसबुकनं WhatsApp चं अधिग्रहण केल्यानंतर त्यांनी आपलं पद सोडलं होतं. त्यांनी टेक टुडेला दिलेल्या विशेष मुलाखतीत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. "सिग्नलचं लक्ष्य तेच फीचर्स असतील ज्याची खऱ्या अर्थानं युझर्सना आवश्यकता आहे. WhatsApp आणि अन्य प्लॅटफॉर्म्ससारख्या फीचर्सवर आम्ही लक्ष देणार नाही," असंही ते म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून भारतातून आम्हाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ७० देशांमध्ये आयओएस अॅप स्टोअरमध्ये सिग्नल हे अॅप टॉपवर आहे. याव्यतिरिक्त अन्य देशांमध्येही अँड्रॉईड अॅप स्टोअरमध्ये हे अॅप टॉपवर आहे. आम्ही अँड्रॉईडवर ५० दशलक्ष युझर्सची संख्या पार केली. यात भारतीय युझर्सची संख्या अधिक असल्याचं ते म्हणाले. "सिग्नल या अॅपनं आपलं अस्तित्व स्वत: तयार केलं आहे. युझर्स या अॅपकडे सुरक्षिततेच्या दृष्टीनं पाहतात. आम्ही कोणाचाही डेटा घेत नाही. भारतासह संपूर्ण जग हे पाहत आहे. आम्ही खुप कमी कालावधीत मोठा बदल पाहिला आहे. अशातच आम्ही आणखी मेहनत करू आणि पुढेही उत्तम सेवा काय ठेवू. तसंच आमचं अॅपही सुरक्षित ठेवू," असा विश्वास त्यांनी यावेळी दिला. ग्राहकांना ज्या गोष्टी हव्या आहेत त्याच आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आमच्यासाठी भारतीय युझर्स महत्त्वपूर्ण आहेत. आम्ही त्यांच्याकडून अधिक सूचना ऐकणं पसंत करू. आमच्याकडे गेल्या काही दिवसांमध्ये वॉलपेपर संदर्भात अधिक सूचना आल्या होत्या. त्या आम्ही लवकरच आणण्याचा प्रयत्न करत आहोत. याव्यतिरिक्त आम्ही अॅपमध्ये मराठी, हिंदी, उर्दू, मल्याळम, पंजाबी, तमिळ, तेलुगु अशा अनेक भाषांचाही सपोर्ट देणार असल्याचे ते म्हणाले.
"WhatsApp ज्या प्रकारे सोडलं त्यावरून प्रायव्हसी भारतीयांसाठी महत्त्वाचा मुद्दा असल्याचं सिद्ध"
By जयदीप दाभोळकर | Published: January 19, 2021 2:58 PM
मराठी, हिंदी, उर्दूसारख्या भारतीय भाषांचाही मिळणार सपोर्ट
ठळक मुद्देआम्ही ग्राहकांच्या सूचनांवर लक्ष देणार आहोत, कार्यकारी अध्यक्षांचं वक्तव्यमराठी, हिंदी, उर्दू, मल्याळमसारख्या अनेक भाषांचा समावेश होणार