नवी दिल्ली : कमी किंमत आणि कमी वेळात लोकप्रिय झालेल्या शाओमी कंपनीच्या आट महिन्यांपूर्वी घेतलेल्या Xiaomi Mi A1 या स्मार्टफोनचा चार्जिंग वेळी स्फोट झाल्याची घटना घडली आहे. एका युजरने याबाबतचा दावा केलेला आहे. त्याचा मित्र मोबाईल चार्जिंगला लावून झोपला असताना हा स्फोट झाला. यामुळे प्राणहानी झालेली नसली तरीही या फोनचे फोटो भयानक आहेत.
युजरच्या दाव्यानुसार या फोनमध्ये कोणताही दोष नव्हता. हा फोन गरम होत नव्हता. हा फोन 8 महिन्यांपूर्वीच खरेदी केला गेला होता. या युजरने शाओमीच्या या Mi A1 या फोनचे काही फोटो पोस्ट केले आहेत. तसेच हा फोन वापरणाऱ्यांनाही सावधानतेचा इशारा दिला आहे की चार्जिंगवेळी जवळ फोन न ठेवता दूर ठेवावा. शाओमीनेही या घटनेला स्वीकारल्यचे दिसत असून या पोस्टवर 'under discussion' असा स्टँप मारलेला आहे. मात्र, कंपनीने यावर कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही.
शाओमीने मागील वर्षी ऑगस्टमध्येच Mi A1 हा स्मार्ट फोन लाँच केला होता. तसेच नुकताच Mi A2 हे अपग्रेडेड व्हर्जनही लाँच केले होते. मात्र, या फोनला बॅटरीला समस्या असल्याचे समजते. या फोनची बॅटरी लवकर संपत आहे. फिंगरप्रिंटचा वापर केल्याने बॅटरी संपत असल्याचा आरोप बऱ्याच ग्राहकांनी केला आहे. काही अहवालांनुसार फिंगरप्रिंट सेन्सर प्रोसेसरच्या सर्व आठही कोअरना अॅक्टीव्हेट करत असल्याने बॅटरी वेगाने खाली होत आहे.