नवी दिल्ली - सोशल मीडियातील सर्वात प्रभावी माध्यम असलेल्या व्हॉट्सअॅपने फेक न्यूजसंदर्भात भारतीय युजर्ससाठी एक पत्रक जारी केले आहे. या पत्रकाद्वारे 10 प्रमुख मुद्द्यांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन भारतीय व्हॉट्सअॅप युजर्संना करण्यात आले आहे. फेक न्यूज आणि अफवांपासून बचाव करण्यासाठी व्हॉट्सअॅपने अभ्यासाअंती हे निवेदन दिले. देशातील वाढते मॉब लिंचिंगचे प्रकार आणि फेक न्यूजमुळे घडणाऱ्या दुर्घटनाबाबत मोदी सरकारने व्हॉट्सअॅपला ठोस पाऊले उचलण्यास सांगितले होते. त्यानंतर व्हॉट्सअपने 10 महत्त्वपूर्ण सूचनांचे पत्र प्रसिद्ध केले आहे.
देशात व्हॉट्सअॅपद्वारे फेक न्यूज आणि मोठ्या प्रमाणात अफवा पसरवल्या जात आहेत. तर काही संघटनांकडून जाणीपूर्वक जातीय तेढ निर्माण करण्यासाठीही चुकीचे मेसेज फॉरवर्ड केले जातात. देशातील शांतता भंग करुन दंगली घडविण्याचा प्रयत्नही करण्यात येत आहे. त्यामुळे मोदी सरकारने व्हॉट्सअॅपला फेक न्यूजसंदर्भात उपाय करण्याचे सूचवले होते. त्यावर, व्हॉट्सअॅपने भारतीय युजर्संसाठी एक महत्वपूर्ण मेसेज दिला आहे.
व्हॉट्सअॅपने सूचवलेले मुद्दे1- फॉरवर्ड केलेला मेसेजपासून सावधान राहा. 2- केवळ अशाच माहितीवर प्रश्न विचारा, जो तुम्हाल सतावत आहे. 3- ज्या माहितीवर विश्वास ठेवणे अवघड वाटते, त्याबाबत खात्री करुन घ्या. 4- जे मेसेज दैनंदिन मेसेजेसपेक्षा काहीतरी विचित्र वाटतात, त्यापासून सावधान. 5- व्हॉट्सअॅपवर आलेल्या छायाचित्रांना काळजीपूर्वक पाहा. 6- मेसेजमध्ये आलेल्या लिंकवर क्ली करुन त्याची खात्री करा. .7- इतर माहिती स्त्रोतांचा वापर करा. 8- विचार करुनच माहिती पुढे फॉरवर्ड करा. 9- सातत्याने चुकीची माहिती किंवा अफवा एखाद्या नंबरवरुन येत असल्यास तो नंबर ब्लॉक करा. 10- खोट्या बातम्या नेहमीच पसरल्या जातात, याबाबत सतर्क राहा.