विवो कंपनीने आपल्या व्ही ९ या अल्प काळातच अतिशय उत्तम प्रतिसाद लाभलेल्या स्मार्टफोनच्या मूल्यात कपात करण्याची घोषणा केली आहे.
या वर्षी मार्च महिन्यात भारतीय बाजारपेठेत विवो व्ही ९ हा स्मार्टफोन एका व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आला होता. याचे मूल्य २२,९९० रूपये इतके होते. आता यात दोन हजार रूपयांची कपात करण्यात आली आहे. यामुळे हे मॉडेल ग्राहकांना २०,९९० रूपयात खरेदी करता येणार आहे. ही कपात अमेझॉन, फ्लिपकार्ट, पेटीएम मॉल आणि विवोच्या ई-स्टोअरसह सर्व ऑफलाईन शॉपीजमध्येही लागू करण्यात आलेली आहे.
विवो व्ही ९ या स्मार्टफोनच्या मागील बाजूस १६ आणि ५ मेगापिक्सल्स क्षमतांचे दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. यात बोके इफेक्ट देण्याची सुविधा आहे. याशिवाय यात कृत्रीम बुध्दीमत्तेने युक्त असणारी एआय ब्युटी मोड प्रणाली, टाईम लॅप्स फोटोग्राफी, प्रोफेशनल मोड, एआर स्टीकर्स, स्मार्ट मोशन, पाम कॅप्चर, जेंडर डिटेक्शन, पॅनोरामा, कॅमेरा फिल्टर्स आदी फिचर्स देण्यात आले आहेत. लक्षणीय बाब म्हणजे यात तब्बल २४ मेगापिक्सल्स क्षमतेचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यातही एआय ब्युटी मोडसह एआर स्टीकर्स, कॅमेरा फिल्टर, एचडीआर आदी फिचर्स देण्यात आले आहेत.
विवो व्ही ९ या मॉडेलची डिझाईन आयफोन एक्स या मॉडेलप्रमाणे टॉप नॉच या प्रकारातील आहे. यात डिस्प्ले टू बॉडी हे गुणोत्तर ९० टक्के इतके आहे. यातील ६.३ इंच आकारमानाचा डिस्प्ले फुल एचडी प्लस म्हणजेच २२८० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचा आहे. यामध्ये क्वॉलकॉमचा ऑक्टा-कोअर स्नॅपड्रॅगन ६२६ प्रोसेसर दिलेला आहे. याची रॅम ४ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे. यात फेस अनलॉक तसेच फिंगरप्रिंट स्कॅनर आदी फिचर्सदेखील देण्यात आले आहेत. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या ओरियो या प्रणालीवर चालणारा असून यावर कंपनीचा फनटच ४.० हा युजर इंटरफेस देण्यात आला आहे. तसेच यात ३,२६० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी दिलेली आहे.