नवी दिल्ली : व्होडाफोन-आयडियाने केंद्र सरकारला एक अशी ऑफर देऊ केली आहे की अशी ऑफर जगात कोणीच अद्याप दिलेली नसेल. ही ऑफर आयडिया कंपनीची जाहिरात 'व्हॉट अॅन आयडिया सरजी!' याच्याशी मिळतीजुळती आहे. तसेच कंपनीने सरकारला सांगितले आहे की केवळ 1 रुपया देऊन तुम्ही अख्खी कंपनी खरेदी करू शकता.
कंपनीला गेल्या दशकात जवळपास दोन लाख कोटींचा तोटा झाला आहे. आणि आता सरकारला 53000 कोटी रुपयांचा एजीआर द्यायचा आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये व्होडाफोनकडून बाजू मांडणारे वकील मुकूल रोहतगी यांनीच ही ऑफर देऊ केल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. त्यांनी दूरसंचार सचिव अंशू प्रकाश यांच्याशी फोनवर चर्चा केली. जर कंपनी बुडाली तर 10000 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात असणार आहे. यासंदर्भात रोहतगी यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. या चर्चेनंतर व्होडाफोन इंडियाचे अध्यक्ष आदित्य बिर्ला यांनी दूरसंचार विभागाचे अधिकारी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन याच्याशी चर्चा केल्याचे बोलले जात आहे.
आता ही नवीन 1 रुपयांत कंपनी खरेदी करण्याची काय भानगड आहे. तर बीएसएनएल 4 जी स्पेक्ट्रम आणि नेटवर्कसाठी प्रयत्न करत आहेत. अशातच सरकारने जर व्होडाफोन आयडिया खरेदी केली तर आयते 30 कोटी ग्राहक मिळणार आहेत. बीएसएनएलच्या 3 जी हून 4 जी मध्ये जाण्याच्या प्रयत्नांना व्होडाफोन आयडियाचे नेटवर्क मदत करेल. यामुळे 1 रुपयांत कंपनीच खरेदी करण्याची ऑफर याच संदर्भातून देण्यात आली आहे. जर सरकारने कंपनीला वाचविण्यासाठी प्रयत्न केले नाहीत तर टेलिकॉम सेक्टर बुडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
रोहतगी यांनी मीडिय़ाला आधीच इशारा दिलेला आहे. जर कंपनी बंद पडली तर टेलिकॉम सेक्टरमध्ये स्पर्धा संपून जाईल आणि केवळ दोनच कंपन्या उरतील. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर व्होडाफोनने 2150 कोटीं सरकारी तिजोरीत जमा केले होते. यानंतर रविवारी एक हजार कोटी भरले आहेत. कंपनीला 15 वर्षांचा अवधी हवा आहे.