मुंबई - व्होडाफोन-आयडिया सेल्युलर या मोबाइल कंपन्यांचे विलीनीकरण लवकरच होणार आहे. या दोन मोठ्या कंपनीच्या युतीमुळं अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात असल्याचे समोर आलं आहे. दोन्ही कंपनीमध्ये 21 हजार कर्मचारी काम कार्यरत आहेत. माध्यमांच्या वृत्तानुसार, दोन्हीचे विलनीकरण झाल्यानंतर त्याच्या एक चतुर्थांश म्हणजेच पाच हजार लोकांच्या नोकऱ्या जाण्याची शक्याता आहे. दोन्ही कंपन्या सध्या तोट्यात असून दोन्ही कंपन्यांना कर्मचारी कपात करण्याचा सल्ला नोडल टीमने दिला आहे.
आयडिया आणि व्होडाफोन या दोन्ही कंपन्यावर 1.20 लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. दोन्ही कंपन्यांच्या विलीनीकरणाला मंजुरी दिली असून याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. एका इंडस्ट्री एक्सपर्टच्या मते, ज्यावेळी दोन्ही कंपन्या एक होतील त्यावेळी एकसारखे काम करणारे अनेक जण असतील त्यामुळं दोन्ही कंपन्यांनी कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. आयडिया ग्रुप आदित्या बिर्ला ग्रुपकडून यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. तर दुसरीकडे व्होडफोन कंपनीने याला अफवा असल्याचे म्हटले आहे.
आयडियामध्ये 11 हजार तर व्होडाफोनमध्ये 10 हजार कर्मचारी काम करतात. भारतामध्ये व्होडाफोन दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर आयडिया तिसऱ्या स्थानावर आहे. दोन्ही कंपन्याचे विलनीकरण झाल्यास 41 कोटी ग्राहक होतील. विलीनीकृत कंपनी ग्राहक आणि महसुलाच्या दृष्टीने भारतातील सर्वांत मोठी दूरसंचार कंपनी ठरणार आहे. जूनअखेरपर्यंत हे विलीनीकरण पूर्ण होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी सांगितले की, दूरसंचार क्षेत्रातील तंत्रज्ञान प्रचंड वेगाने बदलत आहे. २जी तंत्रज्ञानावर आधारित मोबाइल फोनवर फक्त बोलण्याची सुविधा उपलब्ध होती. त्यानंतर, आलेल्या ३जी तंत्रज्ञानात व्हिडीओ पाहण्याची सोय होती. तथापि, ३जी तंत्रज्ञानाचा वापर सुरू होण्यापूर्वीच रिलायन्स जिओने ४जी तंत्रज्ञान आणले. ४जी तंत्रज्ञानाबरोबर ही सेवा स्वस्तही झाली. आता ५जी तंत्रज्ञानाची चर्चा सुरू झाली आहे. ५जीमुळे मोबाइल इंटरनेटची गती आणि दर्जा दोन्हींत सुधारणा होईल.