नवी दिल्ली : रिलायन्स जिओने 4G डाऊनलोडमध्ये आपला दबदबा कायम ठेवला आहे. तर, अपलोडिंगच्या स्पीडमध्ये Vi अव्वल ठरली आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने यासंदर्भातील आकडेवारी जारी केली आहे.
ट्रायकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही आकडेवारी डिसेंबर महिन्यातील आहे. Jio चा डाऊनलोड स्पीड हा सरासरी २०.२ एमबीपीएस एवढा आहे. जिओचा 4G डाऊनलोड स्पीड गेल्या दोन महिन्यांपासून अधिक आहे. एकंदरीत आकड्यांचा विचार केल्यास सलग तीन वर्षांपासून पहिल्या क्रमांकावर आहे.
डिसेंबर महिन्यात Airtel ची कामगिरी घसरलेली पाहायला मिळाली. नोव्हेंबर एअरटेलचा 4G डाऊनलोड स्पीड सरासरी ८ एमबीपीएस होता. डिसेंबर महिन्यात घसरण होऊन 4G डाऊनलोड स्पीड सरासरी ७.८ एमबीपीएस झाला. जिओचा 4G डाऊनलोड स्पीड हा एअरटेलपेक्षा दुप्पट असल्याची माहिती ट्रायकडून देण्यात आली.
Vodafone आणि Idea एकत्रितरित्या काम करत असले, तरी ट्रायकडून या दोन्ही कंपन्यांची कामगिरी वेगवेगळी दर्शवण्यात आली आहे. डिसेंबर महिन्यात व्होडाफोनचा 4G डाऊनलोड स्पीड सरासरी ९.८ एमबीपीएस होता. तर, आयडियाचा 4G डाऊनलोड स्पीड सरासरी ८.९ एमबीपीएस झाला. व्होडाफोन आणि आयडिया यांचे 4G डाऊनलोड स्पीड जिओपेक्षा कमीच असल्याचे सांगितले जात आहे.
डिसेंबर महिन्यात अपलोडिंगच्या बाबतीत व्होडाफोन अव्वल असून, त्याचा 4G अपलोडिंग स्पीड सरासरी ६.५ एमबीपीएस होता. अपलोडिंच्या यादीत आयडिया दुसऱ्या क्रमांकावर असून, त्याचा 4G अपलोडिंग स्पीड सरासरी ६ एमबीपीएस होता. यानंतर एअरटेल असून, त्याचा 4G अपलोडिंग स्पीड सरासरी ४.१ एमबीपीएस होता. तर या यादीत जिओ सर्वांत तळात असून, त्याचा 4G अपलोडिंग स्पीड सरासरी ३.८ एमबीपीएस राहिला. रिअल टाइम आकड्यांच्या आधारे ट्रायकडून हा डेटा प्रसिद्ध करण्यात आला आहे.