अॅमेझॉनकडे आजच्या घडीला 20 कोटी ग्राहक आहेत. जे फक्त अॅमेझॉनचे प्रोडक्ट्स आणि सेवा वापरत नाहीत तर युजर डेटाचा सोर्स म्हणून देखील कंपनीच्या कामी येतात. या डेटाचा वापर करून कंपनी वस्तूंच्या किंमती, सजेस्टेड प्रोडक्ट्स आणि कोणत्या प्रोडक्ट्सची निर्मिती स्वतः करायची हे ठरवते. यासाठी शॉपिंग अॅप, किंडल, रिंग डोर बेल, इको स्मार्ट स्पीकर आणि प्राईम व्हिडीओ सर्व्हिसवरील डेटाचा वापर केला जातो.
युजर्स या सेवांचा जेवढा जास्त वापर करतात तेवढं चांगलं प्रोफाइल त्या युजरचं बनतं. यातून तुम्ही पुढील कोणता प्रोडक्ट खरेदी करणार आहात याचा अंदाज देखील कंपनी आपल्या अल्गोरिदमच्या माध्यमातून लावू शकते. सर्वांनाच आपल्यावरील ही पाळत आवडत नाही. जेव्हा युजर्स अॅमेझॉनकडे असलेली आपली माहिती मागवतात तेव्हा थक्क करणाऱ्या गोष्टी समोर येतात. यात व्हॉइस असिस्टंट अलेक्साशी तुम्ही साधलेल्या संवादाच्या ऑडिओ फाईल्सही असतात.
नेमका कोणता डेटा अॅमेझॉन गोळा करतं आणि हे थांबवण्यासाठी तुम्ही काय करू शकता?
प्रायव्हसी पॉलिसीनुसार गोळा केला जाणारा डेटा
अॅमेझॉन तुमचं नाव, पत्ता, तुम्ही केलेले सर्च आणि अलेक्सा सोबत केलेल्या संभाषणाच्या रेकॉर्डिंग्स गोळा करतं. तुमच्या ऑर्डर्स, तुम्ही प्राईमवर काय पाहता, तुम्ही अपलोड केलेले कॉन्टॅक्टस आणि तुम्ही ई-मेलद्वारे कंपनीशी साधलेला संवादही कंपनीला माहित असतो. अॅमेझॉनची वेबसाईट तुमच्या शॉपिंगचा अनुभव सुधारण्यासाठी कुकी ट्रॅकर वापरते, असं कंपनीनं म्हटलं आहे. ही माहिती तुमच्याविषयी खूप काही सांगू शकते.
“या माहितीवरून तुम्ही कुठं काम करता, कुठं राहता, तुमच्या फावल्या वेळेत तुम्ही काय करता आणि तुमची कुटुंबात व मित्रपरिवारात कोण-कोण आहे, हे अॅमेझॉन सांगू शकतं,” असं डेटा प्रोटेक्शन कन्सल्टन्सीचे रोवेना फिल्डिंग सांगतात.
अशाच प्रकारे अॅमेझॉन प्राईम, अॅमेझॉन फोटोज, किंडल आणि इको स्पिकर्सच्या डेटाचा देखील वापर केला जातो. हा डेटा कंपनी ग्रुपमधील अन्य कंपन्यांशी काही प्रमाणात शेयर करते. तसेच थर्ड पार्टीजशी देखील ही माहिती शेयर केली जाते. थर्ड पार्टीकडे थेट तुमची ओळख पटवणारा डेटा शेयर केला जात नाही, असं अॅमेझॉनचं म्हणणं आहे.
अॅमेझॉनला डेटा गोळा करण्यापासून कसं रोखायचं?
अॅमेझॉन मोठ्या प्रमाणावर डेटा गोळा करतं त्यामुळे कंपनीच्या सेवा वापरणं पूर्णपणे बंद करणं हा एकमेव मार्ग आहे. परंतु काही मार्गांचा अवलंब करून तुम्ही या डेटाचं प्रमाण कमी करू शकता.
तुम्ही कंपनीकडे असलेला तुमचा डेटा मागवू शकता. अलेक्सा आणि रिंग डोर बेलसाठी वेगळे प्रायव्हसी हब आहेत, जिथे तुम्ही तुमच्या रेकॉर्डिंग डिलीट करू शकता तसेच प्रायव्हसी सेटिंग्स बदलू शकता. “Alexa, delete what I just said” किंवा “Alexa, delete everything I said today,” असा आदेशही तुम्ही अलेक्साला देऊ शकता.
डक डक गो किंवा ब्रेव्ह सारखे ब्राउजर वापरून तुम्ही अॅमेझॉनच्या ट्रॅकिंगपासून वाचू शकता. ब्राउजिंग हिस्ट्री ऑफ करणं, इंटरेस्ट बेस्ड जाहिरातींमधून ऑप्ट आऊट करणं इत्यादी देखील काही उपाय आहेत.