स्मार्टफोन्सच्या गर्दीत आपला डिवाइस उठून दिसावा म्हणून कंपन्या नवीन फीचर्स देत असतात. हेच छोटे छोटे फीचर्स एखाद्या स्मार्टफोनला बाकीच्या डिवाइसच्या तुलनेत हटके बनवतात. त्यामुळे बाकी स्पेक्स जरी एकसारखे असले तरी छोटे छोटे फीचर्स असलेल्या मोबाईलची निवड ग्राहक करतात. सध्या असंच एक फिचर स्मार्टफोन्समध्ये दिसू लागलं आहे. या फिचरचं नाव आहे ब्रीदिंग लाईट.
ब्रीदिंग लाईट म्हणजे काय
स्मार्टफोन्सच्या कॅमेरा सेटअपमध्ये हल्ली दोन लाईट्स देण्यात येत आहेत. यातील एक लाईट म्हणजे आपला रेग्युलर एलईडी फ्लॅश तर दुसरी ब्रीदिंग लाईट दिली जात आहे. दोन्हींचा वापर वेगवेगळ्या गोष्टींसाठी केला जातो. यातील कॅमेऱ्याभोवती गोलाकार देण्यात आलेली ब्रीदिंग लाईट अशी चमकते जणू स्मार्टफोन श्वास घेत आहे. म्हणून तिला ब्रीदिंग लाईट असं नाव देण्यात आलं आहे. सध्या भारतात फक्त Oppo F21 Pro मध्ये अशी लाईट मिळत आहे.
उपयोग काय
ब्रीदिंग लाईटला ऑर्बिट लाईट देखील म्हटलं जात आहे. या लाईटचा मोठा वापर नोटिफिकेशन इंडिकेटर म्हणून केला जातो. जेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येतं तेव्हा ही लाईट ब्लिंक होण्यास सुरुवात होते, त्यामुळे फोन पलटी करून जरी ठेवला असेल तरी तुम्हाला नोटिफिकेशनची माहिती मिळते. तसेच फोन चार्जिंगवर असल्यावर देखील ही लाईट अॅक्टिव्हेट होते.
परंतु ही लाईट कॅमेऱ्या सेन्सरच्या भोवताली का देण्यात आली आहे? असा प्रश्न देखील तुम्हाला पडला असेल. त्यामागे देखील एक महत्वाचं कारण आहे. ज्या कॅमेरा सेन्सर भोवती ही लाईट आहे तो एक मॅक्रो कॅमेरा सेन्सर आहे. जो वस्तूंचा आकार 15 किंवा 30 पट मोठा करू शकतो. छोट्या ऑब्जेक्ट कॅप्चर करण्यासाठी याचा वापर केला जातो. त्यामुळे फोन त्या छोट्या वस्तूवर धरावा लागतो. अशावेळी आपला रेग्युलर फ्लॅश चांगली लाईट देत नाही. तिथे ही ब्रीदिंग किंवा ऑर्बिट लाईट योग्य प्रमाणात लाईट पसरवते आणि क्लियर मॅक्रो फोटो काढण्यास मदत करते. तुम्हाला हवी का तुमच्या फोनमध्ये ही ब्रीदिंग लाईट?