हे तर सर्व पालक मान्य करतील की, लहान मुलांना सांभाळणं काही बाहुल्यांचा खेळ नाही. म्हणजे लहान मुलांची जसजशी वाढ होते तसतसे त्यांच्यात कितीतरी बदल बघायला मिळतात. काही बदल असेही असतात जे पालकांना देखील कळत नाहीत. खरंतर पॅरेंटींग सोपी गोष्ट नाही आणि याचा काही असा फॉर्म्युलाही नाही.
अडीच वर्षांची मुलंही वापरतात स्मार्टफोन
अलिकडे आपण आपला जास्तीत जास्त वेळ हा स्मार्टफोन, टॅबलेट किंवा लॅपटॉपवर घालवतो. हेच पाहून आपली मुलंही फार कमी वयात तेच करु लागली आहेत. त्यांना स्मार्टफोनची सवय लागली आहे. आता तर अडीच वर्षांची मुलं देखील स्मार्टफोन वापरु लागली आहेत. पण लहान मुलांकडून याचा अधिक वापर झाल्यास याचे अनेक दुष्परिणाम त्यांना भोगावे लागतात. अशात जर तुम्हीही कन्फ्यूज असाल की, कोणत्या वयात मुलांना स्मार्टफोन द्यायचा. तर जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती बिल गेट्स यांनी यावर आपलं मत व्यक्त केलं आहे.
गेट्स यांनी मुलांना कधी दिला होता मोबाईल
बिल गेट्स यांनी सांगितले की, त्यांनी त्यांच्या मुलांना वयाच्या १४ व्या वर्षांपर्यंत स्मार्टफोन दिला नव्हता. गेट्स यांची मुलं जोपर्यंत हायस्कूलमध्ये गेले नव्हते, तोपर्यंत त्यांना स्मार्टफोन वापरण्याची परवानगी नव्हती. एका रिपोर्टनुसार, लहान मुलांना त्यांचा स्वत:चा मोबाईल मिळण्याचं सरासरी वय हे १० वर्ष आहे. सोबतच या रिपोर्टमध्ये हेही सांगण्यात आलं आहे की, ५० टक्क्यांपेक्षा जास्त मुला-मुलींचं ११ वय असतानाच फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाऊंट असतं.
काय म्हणतात गेट्स?
हे फार गरजेचं आहे की, पालकांनी त्यांच्या मुलांचा स्क्रीन टाइम फिक्स करावा आणि याची काळजी घ्यावी करी, स्मार्टफोनच्या वापराने त्यांची झोप प्रभावित होऊ नये. पण आपण हे ध्यानात ठेवलं पाहिजे की, आपण मुलांना ते काम करण्यास मनाई करु शकत नाही, जोपर्यंत तुम्ही स्वत: ते काम बंद करत नाहीत. कारण ते तुम्हाला पाहूनच अनेक कामे करतात. याता सरळ अर्थ हा आहे की, जर मुलांना स्मार्टफोनपासून दूर ठेवायचं असेल तर तुम्हाला आधी तुमचा स्क्रीन टाईम कंट्रोलमध्ये ठेवावा लागेल.