कोरोना काळात ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्यातही एक मोठा बदल झाला. भारतातच नाही, तर जगभर. तो म्हणजे त्यांचा ‘डिजिटल वेळ’ फार वाढला. घराबाहेर जाता येत नाही, बाहेर कोरोनाची भीती, घरात राहून करणार काय? सीरिअल्स तरी किती पाहणार, त्यात रिमोटवरून हाणामाऱ्या घरोघरी कॉमन. मग हातातला मोबाईल त्यांच्याही मदतीला आला.
नातेवाईक आणि कौटुंबिक ग्रुप्समध्ये सिनिअर्स एकदम ॲक्टिव्ह झाले. काही जण मिळेल तिथून फॉरवर्ड ढकलू लागले तर काही जण फेक न्यूजचेही बळी ठरले. आपलंच खरं करत अनेकांशी ऑनलाइन हुज्जतही घालू लागले. ज्यांना या ग्रुप्सच्या ढकलपंचीचा अनुभव नव्हता, त्यांना शिकताना तरुण नातेवाइकांकडून काहीबाही ऐकून घ्यायला लागल्याने प्रसंगी मानअपमानही उद्भवले.
मात्र, तरीही ऑनलाइन असलेले ज्येष्ठ ही बाजारपेठ ठरावी इतपत ज्येष्ठांचा ऑनलाइन वावर वाढला. मात्र त्यांच्यासाठी म्हणून असा काही ‘खास’ कंटेंट तिथं आहे का?- तर नाही. त्यांनी आपापसात ग्रुप्स केले तर त्या ग्रुप्सवरही राजकारण, त्यावरून होणारे वाद हे सारं सुरूच होतं. आपल्या जगण्याचे, वयानुरुप उद्भवणारे प्रश्न सोडविण्यासाठी समवयस्क मदत, दोस्ती, गप्पा-शेअरिंग असं मात्र ऑनलाइन त्यांच्यासाठी आजच्या घडीला काही नाही. आता मात्र त्या दिशेनंही काही हालचाली सुरू झालेल्या दिसतात, त्याची ही दोन चित्रं.
एक म्हणजे, अलीकडेच आरपीजी ग्रुप नावाच्या कंपनीने एव्हरग्रीन क्लब नावाचं एक ॲप साठीच्या घरातल्या ज्येष्ठांसाठी सुरू केलं. या ॲपवर ज्येष्ठ ई-मीट करू शकतात, गप्पा मारण्यापासून गाणी म्हणणं, अंताक्षरी खेळणं असे कार्यक्रम करू शकतात. मनोरंजन साधनं, व्यायाम, योग यासाठीचे सेमिनार्स आयोजित करून त्यात भाग घेऊ शकतात. ऑनलाइन असलेल्या ज्येष्ठांसाठी लाइफस्टाइल बाजारपेठ ‘सिनेजर्स’ म्हणून आता विकसित होत असताना असे खास ॲप्सही तयार होत आहेत.
दुसरीकडे अमेरिकेत असं चित्र दिसतं की, ऑनलाइन असलेल्या ज्येष्ठांमध्येही अनेकजण डीप्रेशन, एकटेपणा, चिडचिड, बोलायला कुणी नसणं, कुठेच मन न रमणं असे प्रश्न आहेत. त्यामुळे डिजिटली ॲक्टिव्ह बट अलोन अशा ज्येष्ठांचं काय करायचं, असे प्रश्न आता तिथं समोर येत आहेत. त्यावर तोडगे काढायचे तर तेही ऑनलाइन आहेत. मात्र, अनेक ज्येष्ठांना आता या ऑनलाइन जगण्याचा कंटाळा आलेला आहे. त्यामुळे नवे प्रश्न निर्माण होताहेत.