पुणे : उन्हाळा सुरू झाला असून आता तापमानाचा पारा हळूहळू चढू लागला आहे. अशात कूलरचा वापरही वाढत आहे. जुने कूलर बाहेर काढले जात आहेत तर काहीजण एसी परवडत नाही म्हणून नवीन कूलर खरेदी करीत आहेत. मात्र कूलर वापरताना सुरक्षितेसाठी नागरिकांनी शॉक लागू नये यासाठी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. कूलरमध्ये पाणी भरताना स्वीच बंद करावा. पाणी भरून झाल्यावर प्लग पिन लावून स्वीच चालू करावे. कूलर चालू करायच्या आधी कूलरचे कनेक्शन तसेच वायरिंग तारतंत्रीकडून तपासून घ्यावे, असा सल्ला विक्रेत्यांकडून ग्राहकांना कूलर घेताना देण्यात येत आहे.
दहा टक्क्यांनी वाढल्या कूलरच्या किमती :
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कूलरच्या किमतीत १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यासोबतच विविध कंपन्यांच्या कूलरचे दरही दहा ते पंधरा हजार रुपयांपर्यंत गेले आहेत. उन्हापासून गारवा मिळावा म्हणून सध्या बाजारात नागरिक कूलरची खरेदी करताना दिसत आहेत.
दोन वर्षांनी गवत बदला
किमान दोन वर्षांनंतर कूलरमधील गवत बदलले पाहिजे. यामुळे गारवा टिकून राहण्यास मदत होते. तसेच शॉक लागणे किंवा गवताची दुर्गंधी येणार नाही. गवत जीर्ण झाल्यास त्याचा कचरा पाण्यात पडतो आणि कूलर नादुरुस्त होते.
कूलर लावताना काय काळजी घ्याल?
नवीन तंत्रज्ञानानुसार सध्या बाजारात नवने तंत्रज्ञान उपलब्ध असून त्याचा वापर केला जात आहे. यामुळे शॉक लागण्याच्या घटना टाळणे आता शक्य होत आहेत. तरीही जुने कूलर असतील तर त्यामध्ये पाणी टाकताना प्लगची पिन काढून घ्यावी, कूलरचे आर्थिंग व्यवस्थित आहे की नाही? हे तपासून घ्यावे. नागरिकांनी विजेबद्दलची सुरक्षितता न बाळगल्यामुळे शॉक बसण्याच्या घटना घडतात. मात्र नागरिकांनी सुरक्षितेसाठी काळजी घेणे गरजेचे आहे.
इलेक्ट्रिक वस्तूंचे सुटे पार्ट महाग झाले आहेत. त्यातही वाहतुकीचा खर्चही वाढला आहे. परिणामी कूलरच्या किमतीत वाढ झाली असली तरी सध्या उन्हाळा पूर्वीसारखा जाणवत नाही. जोपर्यंत कडक उन्हाळा लागत नाही, तोपर्यंत ग्राहकही कूलर खरेदीसाठी वळत नाहीत. कूलर खरेदीसाठी ग्राहकांचा सध्या अल्प प्रतिसाद मिळत आहे. एप्रिल, मे कडक उन्हाळ्यात कूलर खरेदीसाठी गर्दी असते.
- समीर कोलते, सातारा-रस्ता विक्रेता.