नवी दिल्ली - फेसबुकवरील 5 कोटी युजर्सचं अकाऊंट हॅक करून डेटा चोरी झाल्याची घटना ताजी असताना आता व्हॉट्सअॅपही हॅक होण्याचा धोका निर्माण झाला आहे. व्हॉट्सअॅप हे अत्यंत लोकप्रिय मेसेंजिंग अॅप आहे. व्हॉट्सअॅप कसं हॅक होऊ शकतं. तसेच हॅकर्सपासून तुमचं व्हॉट्सअॅप कसे सुरक्षित ठेवता येऊ शकतं हे जाणून घेऊया.
असं होऊ शकतं व्हॉट्सअॅप हॅक
हॅकर व्हॉट्सअॅप इंन्स्टॉल करून अकाऊंट तयार करण्यासाठी युजर्सच्या फोन नंबरवरून व्हेरिफाय करतो. या प्रक्रियेत व्हेरिफिकेशन कोड हा युजर्सच्या मोबाईलवर जातो. मात्र त्यावेळी युजर्स फोन जवळ नसल्यास व्हॉट्सअॅप व्हेरिफिकेशन फेल होतं आणि त्यानंतर वॉईस व्हेरिफिकेशनसाठी कॉलचा पर्याय मिळतो. या प्रक्रियेत व्हॉट्सअॅपकडून युजर्सना एक कॉल करून त्यांना वन टाईम पासवर्ड सांगितला जातो. युजर्स मोबाईलपासून लांब असतानाच हॅकर व्हॉट्सअॅप हॅक करण्याची प्रक्रिया करू शकतो. कारण युजर्सने व्हेरिफिकेशन कॉल पाहिला नसल्याने तो हॅकरच्या वॉईसमेलमध्ये जातो. त्यानंतर ओटीपीच्या माध्यमातून व्हॉट्सअॅप हॅक केलं जाऊ शकतं.
हॅकर्सपासून तुमचं व्हॉट्सअॅप असं ठेवा सुरक्षित
व्हॉट्सअॅप हॅक होण्यापासून वाचायचे असेल, तर व्हॉट्सअॅप पासवर्ड, पिन किंवा पॅटर्नद्वारे सुरक्षित करावे. तसेच अनोळखी ठिकाणच्या वायफायचा वापर करणेही धोक्याचे आहे. हॅकर्स याद्वारे स्मार्टफोन हॅक करू शकतात.
व्हॉट्सअॅप हॅक झाल्याचे वाटत असेल तर व्हॉट्सअॅप वेबचा आधार घ्या. व्हॉट्सअॅपच्या वेब पर्यायावर गेल्यास तेथे लॉग आऊटचा पर्याय दिसेल. त्यावर जाऊन लगेचच लॉग आऊट या पर्यायावर क्लिक करावे. यानंतर जेवढ्या ठिकाणी तुमचे व्हॉट्सअॅप अकाऊंट सुरू असेल तेथून डिसकनेक्ट करण्यात येईल.
व्हॉट्सअॅप हॅक होण्यापासून वाचवण्यासाठी 2 स्टेप व्हेरिफिकेशन फायद्याचे ठरते. व्हॉट्सअॅपच्या या फिचरमध्ये आपल्याला जास्त सुरक्षा पुरविली जाते. या द्वारे व्हॉट्सअॅप खाते हॅक होण्यापासून वाचता येते. सेट केलेला पासवर्ड अधून मधून विचारला जातो. तसेच दुसऱ्या मोबाईलवर व्हॉट्सअॅप अकाऊंट सुरू केल्यासही आधी पासवर्ड टाकावा लागतो.