WhatsApp चे Delete For Everyone फिचर येऊन चार वर्ष झाली आहेत. परंतु जेव्हापासून युजर्सना आपण पाठवलेले मेसेज रिसिव्हरच्या फोनवरून देखील डिलीट करण्याची संधी मिळाली आहे, तेव्हापासून त्यांच्या अपेक्षा देखील वाढल्या आहेत. डिलीट फॉर एव्हरीवन फीचर वापरून सध्या मेसेज पाठवल्यानंतर 68 मिनिटांच्या आत मेसेज डिलीट फॉर एव्हरीवन करता येतो. आता व्हॉट्सअॅप या वेळ मर्यादेत मोठा बदल करणार आहे.
टेक वेबसाईट WABetaInfo व्हॉट्सअॅपवर येणाऱ्या आगामी फीचर्सवर लक्ष ठेऊन असते. या साईटने दिलेल्या माहितीनुसार डिलीट फॉर एव्हरीवन फिचरवरील वेळेची मर्यादा हटवण्यात येणार आहे. म्हणजे आता मेसेज पाठवून झाल्यावर भविष्यात कधीही तो मेसेज रिसिव्हरच्या फोनवरून डिलीट करता येईल.
रिपोर्टमध्ये, WABetaInfo ने या आगामी फिचरचा एक स्क्रिनशॉट शेयर केला आहे. ज्यात तीन महिने जुना मेसेज डिलीट करण्याचा पर्याय उपलब्ध झाल्याचे दाखवण्यात आले आहे. या स्क्रिनशॉटमध्ये 23 ऑगस्टचा मेसेज डिलीट फॉर एव्हरीवन करता येत असल्याचे दाखवण्यात आले आहे.
सध्या व्हॉट्सअॅप युजर्स 68 मिनिटांच्या आत पाठवलेला मेसेज डिलीट करू शकतात. याआधी ही मर्यादा फक्त 8 मिनिटांची होती, जी 2017 मध्ये वाढवण्यात आली आहे. परंतु आगामी अपडेटमध्ये ही मर्यादा पूर्णपणे काढून टाकण्यात येईल, असे दिसत आहे. विशेष म्हणजे टेलीग्राम आणि इन्स्टाग्रामवर हे फिचर खूप आधीपासून उपलब्ध आहे.