नवी दिल्ली : आमच्या नव्या धोरणासंदर्भातील अटी-शर्तींचा स्वीकार करा, अन्यथा तुमचे अकाऊंट डिलिट केले जाईल, असा इशारा देणाऱ्या व्हॉटस्ॲपने तूर्तास एक पाऊल मागे घेतले आहे. वापरकर्त्यांना नव्या धोरणाचा स्वीकार करण्यासाठी दिलेली ८ फेब्रुवारी ही अंतिम मुदत व्हॉटस्ॲपने आता १५ मेपर्यंत वाढविली आहे.डेटा शेअरिंगबाबत व्हॉटस्ॲपने नवीन धोरणाची आखणी केली आहे. त्यातच आपल्या नव्या धोरणाच्या अटी-शर्तींचा ८ फेब्रुवारीपर्यंत स्वीकार न केल्यास अकाऊंट डिलिट केले जाईल, असा इशारा व्हॉटस्ॲपने दिला होता. या सर्व पार्श्वभूमीवर वापरकर्त्यांची नाराजी व्हॉटस्ॲपने ओढवून घेतली. अनेकांनी व्हॉटस्ॲपचा त्याग करीत सिग्नल वा टेलिग्राम या तुलनेने नव्या संदेशवहन मंचांचा स्वीकार केला. भारतात व्हॉटस्ॲपचे तब्बल ४० कोटी वापरकर्ते आहेत. एवढी मोठी बाजारपेठ हातची जाईल, या भीतीने व्हॉटस्ॲपने वापरकर्त्यांच्या नाराजीची तातडीने दखल घेत नव्या धोरणाची अंमलबजावणी पुढे ढकलली.नव्या भूमिकेविषयी...- वापरकर्त्याचे अकाऊंट ८ फेब्रुवारीला डिलिट होणार नाही- खासगीपणा आणि सुरक्षितता यासंदर्भातील अपप्रचाराला तपशीलवार उत्तरे देणार- नवीन धोरण अमलात येण्यापूर्वी खासगीपणा वा डेटा वापर यांच्या सुरक्षिततेची हमी दिली जाईल- उलटपक्षी नव्या धोरणात लोकांना नवनवीन पर्याय उपलब्ध करून दिले जाणार आहेत- नवीन धोरण अधिकाधिक पारदर्शी असेल
जनजागृतीवर भर -नव्या धोरणाचा पुनर्विचार करीत १५ मेपासून त्याची अंमलबजावणी होईल, असे व्हॉटस्ॲपने स्पष्ट केले. तोवर नव्या धोरणाविषयी व युझर्सच्या खासगीपणाच्या अधिकाराची हमी देण्यासंदर्भात व्हॉटस्ॲपतर्फे जनजागृती केली जाणार आहे.