WhatsApp ची सुरुवात फक्त इन्स्टंट मेसिजिंग अॅप म्हणून झाली असली तरी आता या लोकप्रिय मेसेंजरचा प्रवास सुपर अॅपच्या दिशेनं सुरु झाला आहे. मेटा हळूहळू अनेक अॅप्सला पर्याय ठरतील असे फिचर व्हॉट्सअॅपमध्ये जोडत आहेत. आता ग्रुप व्हिडीओ कॉलमध्ये काही नवीन फीचर्स जोडण्यात आले आहेत, जे ग्रुप कॉलच्या होस्टला जास्त अधिकार मिळतात. तसेच यामुळे झूम,टीम्स आणि गुगल मीट सारख्या अॅप्सची जागा व्हॉट्सअॅप घेऊ शकतं.
आता व्हॉट्सअॅपवर ग्रुप कॉल्स करणारा होस्ट, कॉल दरम्यान कोणत्याही मेंबरला म्यूट करू शकेल. तसेच पर्सनल मेसेज देखील करता येईल. सध्या हे फिचर अँड्रॉइड आणि आयओएस व्हर्जनसाठी रोल आउट करण्यात आलं आहे. ज्याची माहिती व्हॉट्सअॅपचा हेड विल कॅथकार्ट यांनी ट्वीट करून दिली आहे. जर तुमच्या स्मार्टफोनवर हे फिचर उपलब्ध झालं नसेल तर काही दिवस वाट पाहावी लागू शकते.
विल कॅथकार्ट यांनी म्हटलं आहे की, “अनेकदा असं होतं की मीटिंगमध्ये लोकं स्वतःला म्यूट करायचं विसरून जातात, त्यामुळे बराच त्रास होतो. आता, तुम्ही अश्या समस्येपासून सहज सुटका करून घेऊ शकता. कारण होस्ट स्वतः त्या व्यक्तीला म्यूट करू शकेल.”
तसेच आता नवीन व्यक्ती ग्रुप व्हिडीओ कॉलमध्ये समाविष्ट झाल्यास त्याचा अलर्ट व्हॉट्सअॅपकडून सर्वांना दिला जाईल. त्यामुळे कॉलमधील त्यांच्या उपस्थितीची माहिती मिळेल. या फीचर्समुळे लोकप्रिय व्हिडीओ कॉल अॅप्स जसे की, झूम, गूगल मीट आणि टीम्सना पर्याय म्हणून युजर्स व्हॉट्सअॅपचा वापर करू शकतील. ज्या मेसेजिंग अॅपचा वापर अन्य अॅप्सच्या मिटिंग लिंक्स शेयर करण्यासाठी केला जातो त्याच व्हॉट्सअॅपचा वापर आता ऑनलाईन मिटींग्स आयोजित करण्यासाठी केला जाईल.