नवी दिल्ली - WhatsApp हे संवाद साधण्याचं अत्यंत प्रभावी माध्यम असून त्याचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. याच दरम्यान काही युजर्सना मोठा झटका बसला आहे. WhatsApp ने एका महिन्यात तब्बल 18 लाख भारतीयांचे अकाऊंट्स बंद केले आहेत. नवीन IT नियम 2021 चे पालन करत जानेवारी महिन्यात भारतात 18,58,000 अकाउंट्सवर बंदी घेतल्याचे मेटाची मालकी असणाऱ्या WhatsApp तर्फे सांगण्यात आले आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, एका महिन्यात देशभरातून 495 तक्रारी आल्या. ज्यापैकी 24 तक्रारींवर जानेवारीमध्ये कारवाई करण्यात आली. IT नियम 2021 नुसार, आम्ही जानेवारी 2022 साठी आमचा आठवा मासिक अहवाल प्रकाशित केला आहे, असं WhatsApp प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटलं आहे. "नवीन मासिक अहवालात नोंदवल्याप्रमाणे, WhatsApp ने जानेवारीमध्ये 18 लाखांहून अधिक खाती बंद केली आहेत" असेही ते म्हणाले.
शेअर केलेला डेटा 1 ते 31 जानेवारी दरम्यान गैरवापर शोधण्याच्या पद्धतीचा वापर करून WhatsApp द्वारे प्रतिबंधित केलेल्या भारतीय खात्यांची संख्या हायलाइट करतो. ज्यात 'Report Feature' द्वारे युजर्सकडून मिळालेल्या नकारात्मक गोष्टींचा समावेश आहे. कंपनीने सांगितले की "गेल्या काही वर्षांपासून, आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवर आमच्या युजर्सना सुरक्षित ठेवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इतर अत्याधुनिक तंत्रज्ञान, डेटा वैज्ञानिक आणि तज्ञ आणि प्रक्रियांमध्ये सातत्याने गुंतवणूक केली आहे.
मेटा (पूर्वीचे Facebook) ने जानेवारीमध्ये Facebook च्या 13 धोरणांमध्ये 1.16 कोटींहून अधिक कन्टेन्ट आणि Instagram साठी 12 धोरणांमध्ये 3.2 दशलक्षाहून अधिक कन्टेन्ट काढून टाकला आहे. नवीन IT नियम 2021 अंतर्गत, 50 लाखांहून अधिक युजर्स असलेल्या मोठ्या डिजिटल आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला मासिक अनुपालन अहवाल प्रकाशित करावा लागतो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.