मुंबई: व्हॉट्स ऍप, इन्स्टाग्राम, फेसबुक आणि फेसबुक मेसेंजरमध्ये तांत्रिक अडचणी आल्या आहेत. त्यामुळे व्हॉट्स ऍप, इन्स्टाग्राम, फेसबुक आणि फेसबुक मेसेंजरची सेवा खंडित झाली आहे. अँड्रॉईड, आयओएससोबतच डेस्कस्टॉपवरही समस्या उद्भवत असल्यानं वापरकर्ते त्रासले आहेत.
फेसबुक वापरकर्त्यांना न्यूज फीड रिफ्रेश करता येत नाहीए. इन्स्टाग्रामवरही सारखीच परिस्थिती आहे. व्हॉट्स ऍपचा वापर कोट्यवधी लोक करतात. दर तासाला अब्जावधी मेसेजची देवाणघेवाण होते. मात्र व्हॉट्स ऍपची सेवा ठप्प झाल्यानं वापरकर्ते हैराण झाले आहेत.
व्हॉट्स ऍप, इन्स्टाग्राम, फेसबुकचे सर्व्हर डाऊन झाल्यानं जगभरात कोट्यवधी लोकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे.डाऊन डिटेक्टर या संकेतस्थळानुसार, १३ हजारांहून अधिक जणांनी व्हॉट्स ऍपचा वापर करताना समस्या उद्भवत असल्याची तक्रार केली आहे. फेसबुक आणि इन्स्टाग्राम वापरत असताना अडथळे येत असल्याची तक्रार नोंदवणाऱ्यांची संख्यादेखील हजारोंच्या घरात आहे. कोट्यवधी लोकांना व्हॉट्स ऍपवरून मेसेज पाठवण्यात अडचणी येत आहेत. समोरून मेसेजदेखील येत नाहीएत. लवकरात लवकर समस्या सुटेलसर्व्हर डाऊन झाल्यानं गेल्या पाऊण तासापासून व्हॉट्स ऍप, इन्स्टाग्राम, फेसबुकचा वापर करता येत नाहीए. अनेकांनी त्यांच्या समस्या मांडण्यासाठी ट्विटरचा आधार घेतला आहे. फेसबुक आणि व्हॉट्स ऍप यांनाही त्यांच्या वापरकर्त्यांमध्ये पोहोचण्यासाठी ट्विटरचाच आधार घ्यावा लागला आहे. 'काहींना आमच्या सेवेचा वापर करताना अडचणी येत आहेत. ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न आमच्याकडून सुरू आहे. तसदीबद्दल क्षमस्व,' असं ट्विट फेसबुक, व्हॉट्स ऍपनं केलं आहे.