नवी दिल्ली :सोशल मीडिया आणि स्मार्टफोनच्या जमान्यात प्रत्येक जण मेसेजिंग आणि चॅटिंगसाठी व्हॉट्सॲपचा वापर सध्या करत आहे. असे असताना आता व्हॉट्सॲपवरील युजर्सच्या प्रायव्हसीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ॲप वापरात नसतानाही व्हॉट्सॲपवर वापरकर्त्यांच्या परवानगीशिवाय त्यांच्या मायक्रोफोनमध्ये प्रवेश केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची गंभीर दखल केंद्र सरकारने घेतली असून, याची चौकशी करण्याची घोषणा इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी बुधवार केली.
राज्यमंत्री चंद्रशेखर यांनी ट्विटरवर लिहिले की, नवीन डिजिटल व्यक्तिगत माहिती संरक्षण विधेयक अजून तयार होत असले तरी सरकार खासगी माहितीच्या गोपनीयतेच्या कथित उल्लंघनाची चौकशी करील. याबाबत व्हॉट्सॲपने म्हटले की, तुम्हाला कोणत्याही अनोळखी नंबरवरून कॉल आला तर तो रिसिव्ह करू नका. कॉल कट केल्यानंतर त्वरित तक्रार करा आणि अशा नंबरला ब्लॉक करा.
नेमके काय झाले?
ट्विटरच्या अभियांत्रिकी विभागातील संचालक फोड डाबिरी यांनी शनिवारी एका ट्वीटमध्ये म्हटले होते की, ‘हे काय सुरू आहे? व्हाॅट्सॲप ‘बॅकग्राउंड’ला मायक्रोफोनचा वापर करत होते.
मी झोपेत असताना हा प्रकार सुरू होता. सकाळी सहा वाजता उठलो तेव्हा मला याची माहिती मिळाली.’ डाबिरी यांच्या ट्वीटला उत्तर देताना राज्यमंत्री चंद्रशेखर यांनी म्हटले की, ‘अशाप्रकारचे उल्लंघन अजिबात स्वीकारार्ह नाही. हे गोपनीयतेचे उल्लंघन आहे.
आम्ही याची तातडीने चौकशी करू. खासगी गोपनीयतेच्या कोणत्याही उल्लंघनावर कारवाई होईल. डाबिरी यांचे ट्वीट व्हायरल झाले आहे. ते ६.५ कोटी वेळा पाहिले गेले आहे. डाबिरी यांनी त्यासोबत स्क्रीनशॉटही सामायिक केला आहे.
हॉट्सॲप म्हणते...
अँड्रॉइडमधील एका व्हायरसमुळे हा प्रकार घडला आहे.यात सुधारणा करण्याच्या सूचना आम्ही गुगलला केल्या आहेत.’ व्हाॅट्सॲपने पुढे म्हटले की, ‘वापरकर्त्यांचे आपल्या माइक सेटिंगवर संपूर्ण नियंत्रण आहे.