नवी दिल्ली : रिलायन्स जिओ फोन वापरणाऱ्यांसाठी एक खूशखबर आहे. जिओ फोन-2 वर आता व्हॉट्सअॅप वापरता येणार आहे. यासाठी युजर्सला जिओ अॅप स्टोअरमधून व्हॉट्सअॅप डाऊनलोड करावे लागणार आहे. व्हॉट्सअॅपने जिओ फोन -2 युजर्ससाठी नवीन व्हर्जन लाँच केले आहे. व्हॉट्सअॅप जिओ फोनच्या KaiOS या ऑपरेटिंग सिस्टिमवर असून 10 सप्टेंबरपासून जिओ अॅपमध्ये उपलब्ध आहे. याचबरोबर, जिओच्या सर्व फोनमध्ये 20 सप्टेंबरपासून उपलब्ध होणार आहे.
भारतात अनेक लोक व्हॉट्सअॅपचा वापर करत आहेत. व्हॉट्सअॅप आता जिओ फोनवर संपूर्ण भारतात उपलब्ध होणार आहे, असे व्हॉट्सअॅपचे उपाध्यक्ष ख्रिस डॅनियल्स यांनी सांगितले. याचबरोबर, KaiOS या ऑपरेटिंग सिस्टिमसाठी डिझाइन करण्यात आलेले व्हॉट्सअॅप भारतातील लोकांसाठी एक चांगले माध्यम बनेल अशी आशा आहे. तसेच, जिओ फोन युजर्संना चांगली मेसेजची सर्व्हिस देईल, असेही ख्रिस डॅनियल्स यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांपूर्वी रिलायन्स जिओने आपला जिओ फोन-2बाजारात आणला आहे. या फोनची किंमत 2,999 रुपये आहे. तसेच, यामध्ये 2.4 इंचाचा QVGA डिस्प्ले, QWERTY कीपॅड देण्यात आला आहे. या फोनची रॅम 512 एमबी आणि 4 जीबी स्टोरेज मेमरी आहे.
जिओ फोन-2 ची खासियत.....
व्हिडीओ कॉलिंग : Jio Phone 2 हा एक फिचर फोन असून देखील यामध्ये व्हिडीओ कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे. बाजारात असलेल्या कमी किंमतीतील फिचर फोनमध्ये व्हिडीओ कॉलिंग फिचरचा पर्याय उपलब्ध नसतो. भारतातील अनेक जण हे साध्या फोनपेक्षा स्मार्टफोनचा वापर अधिक करतात. तसेच हल्ली व्हिडीओ कॉलिंग फिचरचा वापरही मोठ्याप्रमाणात केला जातो. त्यामुळेच Jio Phone 2 मध्ये असलेली व्हिडीओ कॉलिंगची सुविधा हे या फोनच एक खास वैशिष्ट्य आहे.
मनोरंजन : Jio Phone 2 मध्ये युजर्सच्या मनोरंजनासाठीही खास तरतूद करण्यात आली आहे. या फोनच्या माध्यमातून जिओचे एंटरटेन्मेंट अॅपचा वापर युजर्स करू शकतात. यामध्ये युजर्सला जिओ म्युझिक, जिओ टीव्ही, जिओ सिनेमासारखे मनोरंजनाचे अॅप वापरण्याची सुविधा उपलब्ध आहे. जिओने दिलेलं हे फिचर इतर कोणत्याही फिचर फोनमध्ये नाही.
व्हॉईस असिस्टंट : गूगलने सर्वप्रथम व्हॉईस असिस्टंटचा पर्याय हा जिओ फोनमध्येच दिला आहे. Jio Phone 2 मध्ये ही सुविधा हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेत उपलब्ध आहे. गूगलच्या व्हॉईस असिस्टंटच्या सुविधेमध्ये कोणतेही शब्द टाईप न करता केवळ बोलून फोन तुम्ही दिलेल्या आदेशाचं पालन करतो.
व्हॉटस्अॅप, फेसबुक, यूट्यूब : सोशल मीडियावर अनेक जण खूप वेळ घालवत असतात. व्हॉटस्अॅप, फेसबुक, यूट्यूबसारखे अॅपची सध्या तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ आहे. Jio Phone 2 मध्ये हे तिन्ही अॅप वापरण्याची सुविधा देण्यात आली आहे. इतर स्मार्टफोनच्या तुलनेत Jio Phone 2 किंमत ही अत्यंत कमी आहे.
('या' पाच वैशिष्ट्यांमुळे Jio Phone 2 आहे इतर फोनपेक्षा खास)