व्हॉट्सअॅपने गेल्या महिन्यात आपल्या युपीआय आधारित पेमेंट सेवेची सुरुवात केली आहे. ही सेवा सध्या व्हॉट्सअॅपच्या अँड्रॉइड बीटा युजर्सना वापरता येत आहे. आता या युजर्सना कॅशबॅक देण्यास कंपनीने सुरुवात केली आहे. याद्वारे कंपनी युपीआय पेमेंट सेगमेंटमध्ये आपला जम बसवण्याचा प्रयत्न करत आहे.
व्हॉट्सअॅप अँड्रॉइड बीटा अॅपच्या चॅट लिस्टच्या वर कंपनीने एक बॅनर पब्लिश केला आहे. ज्यात “Give cash, get ₹51 back,” असे लिहिण्यात आले आहे. तुम्ही 5 वेळा वेगवेगळ्या कॉन्टॅक्ट नंबर्सना पैसे पाठवून गॅरेंटेड 51 रुपयांचा कॅशबॅक मिळवू शकता. व्हॉट्सअॅपने या कॅशबॅक ऑफरसाठी पेमेंटच्या रकमेसाठी कोणतीही मर्यादा ठेवली नाही. त्यामुळे तुम्ही फक्त 10 रुपये जरी पाठवला तरी तुम्हाला त्वरित 51 रुपयांचा कॅशबॅक मिळेले.
निश्चित कॅशबॅक जरी मिळत असला तरी हा कॅशबॅक फक्त पाच वेळा मिळवता येईल. व्हॉट्सअॅपचे पेमेंट फिचर सध्या फक्त अँड्रॉइड बीटा युजर्ससाठी उपलब्ध आहे. परंतु लवकरच हे फिचर भारतात सर्वांसाठी खुले करण्यात येईल, अशी अपेक्षा आहे.
या नव्या ऑफरच्या माध्यमातून कंपनीला युपीआय आधारित पेमेंट सर्व्हिसमध्ये जम बसवायचा आहे, असे दिसत आहे. त्यामुळेच कंपनीने फोन पे, गुगल पे आणि इतर पेमेंट अॅपप्रमाणे कॅशबॅक देण्यास सुरुवात केली आहे.
व्हॉट्सअॅपने या सेवेसाठी मेसेज बॉक्सच्या बाजूला रुपयाचे चिन्ह (₹) दिले आहे. जेणेकरून पेमेंट करणे सोप्पे होईल. ही सेवा युपीआय आधारीत असल्यामुळे तुम्ही कोणत्याही बँकेचे अकॉउंट याला जोडू शकता आणि इतर पेमेंट अॅप्सप्रमाणे पेमेंट करू शकता.