सोशल मेसेंजिंग प्लॅटफॉर्मवर कमालीचे लोकप्रिय असलेल्या व्हॉट्स अॅप नवनवीन फिचर्स देत आहे. यामुळे युजर्सही अनेक अॅप आली तरीही व्हॉट्सअॅपवर खिळून राहिलेले आहेत. मात्र, बदल करण्याच्या नादात अनेकदा युजरना त्रासही अनुभवायला मिळालेले आहेत. आता व्हॉट्सअॅपच्या नव्या व्हर्जनमुळे मोबाईलची बॅटरी लंवकर संपत असल्याच्या तक्रारी युजरनी केल्या आहेत.
आतापर्यंत अँड्रॉईडचे युजर व्हॉट्सअॅपमुळे वेगाने बॅटरी संपत असल्याची तक्रार करत होते. मात्र, आता आयफोनधारकांनीही तक्रारीचा पाऊस पाडला आहे. रेडीट फोरमच्या एका वृत्तानुसार Xiaomi Redmi Note 7 च्या युजरना व्हॉट्सअॅपच्या वापरावेळी बॅटरी लगेचच संपू लागल्याचा अनुभव आला होता. यानंतर Samsung Galaxy S9, Honor 6X आणि वनप्लसच्या युजरनाही ही समस्या भेडसावत आहे. याबाबतची तक्रार त्यांनी सोशल मीडियावर केली आहे.
तर WAbetainfo द्वारे देण्यात आलेल्या माहितीनुसार आता काही आयफोन युजरनीही WhatsAppमुळे बॅटरी संपत असल्याची तक्रार केली आहे. व्हॉट्सअॅपच्या iOS 2.19.112 व्हर्जनवर डिव्हाईसची बॅटरी लवकर संपत आहे. याचा अर्थ आता अँड्रॉईड आणि आयफोनच्या दोन्ही युजरना ही समस्या भेडसावू लागली आहे.
हे अॅप पाठीमागे अधिक बॅटरी वापरत आहे. काहींनी स्क्रीनशॉट शेअर करत व्हॉट्सअॅपने 27 ते 40 टक्के बॅटरीचा वापर केला होता. कंपनीकडून अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.