नवी दिल्लीः 'व्हॉट्सअॅप ग्रूपमध्ये पडणारा मेसेजचा पाऊस कधी-कधी नकोसा होतो रे, कुणीही काहीही टाकत असतं आणि त्यावर बिनकामाची चर्चा सुरू होते, फुकटचा डोक्याला ताप...' अशी व्यथा मांडणाऱ्यांपैकी तुम्ही असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. पण, तुम्ही व्हॉट्सअॅप ग्रूपचे सक्रिय सदस्य असाल, धडाधड पोस्ट टाकण्यात माहीर असाल, तर मात्र व्हॉट्स अॅपचं नवं फीचर पाहून तुम्ही 'व्हॉट द फालतूगिरी' असंच म्हणाल.
आयओएस, अँड्रॉइड आणि विंडोज फोनमध्ये व्हॉट्सअॅप लवकरच 'रिस्ट्रिक्ट ग्रूप' नावाचं फीचर आणणार असल्याचं कळतं. या फीचरमुळे फक्त ग्रूप अॅडमिनलाच ग्रूपमध्ये परवानगीविना मेसेज पाठवता येईल. इतर सर्व सदस्यांना मेसेज, फोटो, व्हिडिओ, जिफ, डॉक्युमेंट किंवा व्हॉइस मेसेज पाठवण्यासाठी अॅडमिनची परवानगी घ्यावी लागणार आहे.
2.18.132 या अँड्रॉइड व्हर्जनमध्ये 'अॅडमिन सेटिंग्स' नावाचा पर्याय ग्रूप इन्फोमध्ये समाविष्ट केला जाईल. तिथून ग्रूप अॅडमिन सदस्यांना 'रिस्ट्रिक्ट' करू शकेल. त्यानंतर, या सदस्यांना फक्त ग्रूपवरचे मेसेज वाचता येतील. त्यांना ग्रूपवर एखादी पोस्ट करायची असेल तर 'मेसेज अॅडमिन' हे बटण वापरून आधी तो मेसेज अॅडमिनला पाठवावा लागेल आणि त्यानं 'अॅप्रूव्ह' केल्यावरच तो ग्रूपवर दिसू लागले.
हे फीचर काही ग्रूपच्या बाबतीत अत्यंत उपयुक्त ठरू शकतं. व्हॉट्सअॅप ग्रूपवरून पसरवल्या जाणाऱ्या अफवा, चुकीची माहिती किंवा समाजात तणाव निर्माण करणाऱ्या मेसेजना काही प्रमाणात आळा घालणं या फीचरमुळे शक्य होणार आहे. व्हॉट्सअॅप ग्रूपवरचा वाद विकोपाला जाऊन अगदी मारहाणीपर्यंत प्रकरण गेल्याच्या घटना काही ठिकाणी घडल्यात. जाती-धर्मांत तेढ निर्माण होण्याचा धोकाही मोठ्या प्रमाणात वाढलाय. हे सगळं 'रिस्ट्रिक्ट' करण्यासाठी 'रिस्ट्रिक्ट ग्रूप' फीचर फायद्याचं ठरू शकतं. पण, या फीचरमुळे अॅडमिनचा ताप भलताच वाढणार असल्यानं, किती अॅडमिन या फीचरचा वापर करतील, ही शंंकाच आहे.