व्हॉट्सॲप युजर्सच्या आयुष्याचा एक भाग बनलं आहे. व्हॉट्सॲपशिवाय अनेक कामं अपूर्ण राहतात. व्हॉट्सॲपचे जगभरात अब्जावधी वापरकर्ते आहेत. मात्र, आता याच व्हॉट्सॲपद्वारे स्कॅमर्स युझर्सना टार्गेट करत आहेत. अलीकडेच एक नवीन प्रकरण समोर आलंय. ज्यामध्ये लोकांना आंतरराष्ट्रीय नंबरवरून युझर्सना कॉल येत आहेत. इथिओपिया (+251), मलेशिया (+60), इंडोनेशिया (+62), केनिया (+254), व्हिएतनाम (+84) आणि यांसारख्या विविध देशांमधून हे कॉल येत आहेत. दरम्यान, हे कॉल त्या देशाच्या क्रमांकावरून आलेत म्हणून तिथूनच आले असतील असंही नाही.
आपल्या सर्वांना माहित आहे की व्हॉट्सॲप कॉल इंटरनेटद्वारे केले जातात. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, सध्या अशा एजन्सी कार्यरत आहेत ज्या व्हॉट्सॲप कॉलसाठी आंतरराष्ट्रीय नंबर्सची विक्री करत आहेत. कोणत्याही आंतरराष्ट्रीय कॉल शुल्काची चिंता न करता या क्रमांकांवरून कॉल करता येतात. दरम्यान, आतापर्यंत अनेकांनी अशाप्रकारे व्हॉट्सॲपवरून कॉल येत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत.
तुम्ही काय कराल?
यासाठी तुम्ही काय करू शकता? हे टाळण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे कोणत्याही अनोळखी आंतरराष्ट्रीय कॉलला उत्तर न देणं. जर तुम्हाला अचानक आंतरराष्ट्रीय नंबरवरून कॉल आले तर ते बंद किंवा डिस्कनेक्ट करा आणि अतिरिक्त सुरक्षिततेसाठी नंबर ब्लॉक करणं कधीही चांगलं.
तुमचे वैयक्तिक तपशील मिळवण्याचा प्रयत्न करण्यापासून ते तुमचे पैसे चोरण्यापर्यंत, अशा अनेक गोष्टी स्कॅमर्सकडून केल्या जाऊ शकतात.
फोनवरून सांगितल्यास तुम्ही कधीही कोणत्याही खात्यात पैसे ट्रान्सफर करू नका, याशिवाय तुम्ही तुमचा तपशील कोणत्याही अज्ञात व्यक्तीला कधीही सांगू नका.
जॉब ऑफर करूनही स्कॅम
कॉल्स व्यतिरिक्त, नोकरीच्या ऑफर WhatsApp मेसेजेसद्वारे पाठवण्यात येत आहेत. ज्यात स्कॅमर एका नामांकित कंपनीचे असल्याचे भासवतात आणि तुम्हाला सांगतात की ते तुम्हाला पार्टटाईम नोकरी देऊ शकतात. बहुतेक प्रकरणांमध्ये, स्कॅमर प्रथम एखादे काम पूर्ण करण्यासाठी लहान बक्षीसं देऊन लोकांना भुरळ घालतात. एकदा का युझर्सना त्यांचे पैसे मिळाले की ते स्कॅमरवर विश्वास ठेवू लागतात आणि त्यानंतर ते एका मोठ्या स्कॅममध्ये अडकतात. यापूर्वीही अशी प्रकरणं समोर आली आहेत.