मुंबई: जगात सर्वाधिक वापरलं जाणारं मेसेजिंग ऍप व्हॉट्स ऍप लवकरच नवीन फीचर देणार आहे. त्यामुळे व्हॉट्स ऍप ऍडमिनला नवे अधिकार मिळणार आहेत. कंपनी नव्या अपडेटवर काम करत आहे. नवं अपडेट आल्यानंतर ऍडमिनला ग्रुपमधील कोणत्याही सदस्याचे मेसज डिलीट करता येतील. त्यामुळे ग्रुपमध्ये कोणते मेसेज ठेवायचे आणि कोणते हटवायचे याचा निर्णय सर्वस्वी ऍडमिनचा असेल. या फीचरचं टेस्टिंग सुरू करण्यात आलं आहे. लवकरच हे फीचर यूझर्सना वापरता येईल.
Wabetainfoनं दिलेल्या वृत्तानुसार, कंपनी या फीचरसाठी बिटा व्हर्जन 2.22.1.1 जारी केलं आहे. त्यामुळे ऍडमिनला ग्रुपवर दुसऱ्या सदस्यांना केलेले मेसेज डिलीट करण्याची सुविधा मिळते. ग्रुपच्या सर्व ऍडमिन्सना सर्वांचे मेसेज डिलीट करण्याचे अधिकार असतील.
जेव्हा ग्रुप ऍडमिन एखादा मेसेज डिलीट करेल, तेव्हा व्हॉट्स ऍप स्क्रीनवर एक इंडिकेटर दाखवेल. हा मेसेज एका ऍडमिननं हटवला आहे (This was removed by an admin), अशी सूचना व्हॉट्स ऍपकडून दाखवण्यात येईल. त्यामुळे मेसेज कोणी डिलीट केला आहे, याची माहिती ग्रुपमध्ये असलेल्या अन्य सदस्यांना मिळू शकेल. नव्या फीचरमुळे ऍडमिनला अतिरिक्त अधिकार मिळतील. त्यामुळे ग्रुप ऍडमिनला अश्लील आणि आक्षेपार्ह मेसेज हटवणं सोपं होईल.