नवी दिल्ली : लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲपची सेवा मंगळवारी दुपारी अचानक ठप्प झाली. दुपारी जवळपास दीड तास सेवा ठप्प झाल्याने भारतासह अनेक देशांमधील वापरकर्त्यांचा गोंधळ उडाला. सुमारे साडेबाराच्या सुमारास सेवा ठप्प झाली. त्यानंतर साधारण दीड तासानंतर दोन वाजून सहा मिनिटांनी सेवा पूर्ववत होण्यास सुरुवात झाली आणि त्यानंतर कुठे कोट्यवधी वापरकर्त्यांचा जीव भांड्यात पडला.
सर्वाधिक काळ आलेला व्यत्यय -व्हॉट्सॲपच्या सेवेत या वर्षातील हा सर्वाधिक काळ आलेला व्यत्यय ठरला. गेल्या वर्षी ५ ऑक्टोबर २०२१ रोजी व्हॉट्सॲप सेवांमधील शेवटचा-प्रदीर्घ व्यत्यय नोंदवला गेला होता. त्यावेळी इन्स्टाग्राम, मेसेंजर आणि फेसबुकदेखील बराच वेळ ठप्प झालेसेवा ठप्प झाल्यानंतर ट्विटर आणि फेसबुककडे बहुतांश वापरकर्त्यांनी मोर्चा वळवला. ट्विटरवर तर हा विषय लगेचच ट्रेंडिंगमध्ये आला. दिवाळी किंवा कोणत्याही मोठ्या सणाच्या दुसऱ्या दिवशी व्हॉट्सॲप डाउन होणे, ही एक परंपरा बनली आहे, अशा प्रतिक्रिया नेटकरी देत होते. याशिवाय मजेशीर मिम्सचा तर पूरच आला होता. नवी दिल्ली, बेंगळुरू, कोलकाता आणि मुंबई या शहरांसह इंदूर, सुरत आणि कटकसारख्या छोट्या शहरांमध्येही अशीच समस्या होती.
का ठप्प झाली सेवा? ‘संदेश पाठवण्यात काही लोकांना समस्या आल्याची कल्पना आहे. आम्ही समस्येचे निराकरण केले आहे आणि झालेल्या गैरसोयींबद्दल आम्ही दिलगीर आहोत’, अशी प्रतिक्रिया व्हॉट्सॲपची मूळ कंपनी मेटाने दिली. मात्र, समस्येचे कारण कंपनीने स्पष्ट केले नाही. त्यामुळे नेमके कशामुळे सेवा ठप्प झाली होती हे समजू शकलेले नाही.
जगभरात फटका... वैयक्तिक चॅट्स तसेच ग्रुप चॅट्सवर परिणाम झाला. वेबसाइट्सचा मागोवा घेणारे प्लॅटफॉर्म डाउनडिटेक्टरच्या मते...
६९% लोकांना संदेश पाठवताना समस्या आल्या
२४% लोकांना सर्व्हर कनेक्शनमध्ये समस्या आली आणि सात टक्के लोकांना एकंदर ॲपमध्ये समस्या होत्या.
२७,०००+ वापरकर्त्यांनी दीड तासातच याबाबत तक्रार नोंदवली.
अनेकांना शंका खरंच सेवा ठप्प झाली की आपल्यालाच ही समस्या येत आहे याबाबत अनेकांना शंका होती. त्यामुळे काहींनी फोनमधून व्हॉट्सॲप डिलिट करून पुन्हा इन्स्टॉल करण्याची चूकही केली.
२४००% पर्यायांची शोधाशोध वाढली'डिजिटल फनेल'ने संकलित केलेल्या माहितीनुसार, सेवा खंडित झाल्याचे पहिल्यांदा लक्षात आल्यापासून, सकाळी आठ वाजल्यापासून जगभरात 'व्हॉटस्ॲपला पर्याय' याचा शोध घेण्याचे प्रमाण तब्बल २४०० टक्क्यांनी वाढले. मेसेजिंग ॲप ‘सिग्नल’ला सर्च करण्याच्या प्रमाणात सकाळी आठ वाजल्यापासून १३८.०९ टक्के वाढ झाली; तर, गोपनीयता-केंद्रित मेसेंजर 'थ्रीमा'ला सर्च करण्याचे प्रमाणही ४०० टक्क्यांनी वाढले होते.