>> स्वाती गाडगीळ
पंखा हा आपल्या दैनंदिन जीवनातला अविभाज्य घटक आहे. पंख्याविना घर ही कल्पनाच कोणी करू शकत नाही. असा हा पंखा उन्हाळ्यात गारवा देतो तर हिवाळ्यात आराम करतो. पण जेव्हा फिरतो तेव्हा मात्र वीज खेचतो. कुठलाही पंखा कमी वेगाने फिरताना वीज कमी लागते आणि वेग जास्त असेल, तर जास्त वीज त्यासाठी खर्च होते.
घरात सारखा जो पंखा वापरला जातो, त्याच्या पात्यांवर (ब्लेड्स) एकाच कडेला धूळ जमते आणि ती काळी दिसू लागतात. जेव्हा आपण ती पुसतो तेव्हा लक्षात येतं पंख्याची पाती थोडी वाकडी असतात. का बरं सरळ नसावी, याचा कधी विचार केलाय? पंख्याची पाती सर्वसाधारणपणे १२ अंशांनी वाकलेली असतात. तो कोन १६ अंशांचा असेल तर खालच्या वस्तू उडू शकतात. या १२ अंशांमुळे वारा खाली फेकायला मदत होते. ब्लेडचा आकार बाहेरच्या बाजूला मोठा आणि वक्राकार असतो त्यामुळे वारा खेळता राहतो.
घरात साधारणपणे तीन ब्लेडचा पंखा वापरला जातो. जास्त ब्लेडने पंख्याच्या मोटरवर ताण येतो. दोन ब्लेडवाले पंखेसुद्धा असतात. त्यांची पाती लांब असतात व जास्त वारा देतात. पंखा विद्युत चुंबकत्वाच्या तत्त्वावर चालतो. खोलीच्या आकाराप्रमाणे ब्लेडची लांबी ठरविली जाते. २४ इंच ते ५६ इंच लांबीची ब्लेड घरासाठी वापरतात. मॉलमध्ये दीड मीटर लांबीचे आणि सात किंवा अधिक ब्लेड असलेले मोठे पंखे बघायला मिळतात. विमानतळावर अगदी हळू फिरणारे पंखे असतात. ते एका मिनिटात ३०-९० आवर्तने घेतात. त्यांचा व्यास २४ फूट असतो. मोठ्या खोलीत छोट्या ब्लेडचा पंखा उपयोगाचा नाही.
१०० स्क्वेअर फुटांच्या खोलीत ३६ इंच, २०० स्क्वेअर फूट असल्यास ४२ इंच आणि ४०० स्क्वेअर फूट असल्यास ५२ इंच पंखा लावावा, वाऱ्याचा स्थिर वेग आणि वाऱ्याचा दाब या दोन कारणांनी पंख्याची हवा खेळती होते. क्लॉकवाईज फिरणारे पंखे थंड प्रदेशात किंवा हिवाळ्यात वापरतात. त्यामुळे घरातील हीटिंग सिस्टीमची गरम हवा पंखा वर ओढून घेतो आणि पुन्हा खाली सोडतो. यामुळे हीटिंग सिस्टीमच्या ऊर्जेची बचत होते. एक्झॉस्ट फॅन खोलीच्या बाहेर हवा फेकतो. हा फॅन नॉर्मल फॅनसारखा वापरू शकतो का? हो, उलटा फिरवून लावला तर पंख्यासारखा वारा येईल; पण तो तेवढ्या क्षमतेने काम करू शकत नाही. कारण निश्चित आकाराच्या खोलीतून बाहेर हवा फेकणे हे त्यांचं कार्य आहे.