अगदी खरं खरं सांगा, तुम्ही आजारी पडलात किंवा आजारी पडल्यासारखी लक्षणं तुम्हाला दिसायला लागली किंवा अगदी डॉक्टरकडे जाऊन आल्यानंतर तुम्ही काय करता?... बहुतांश जण कोणा तज्ज्ञाचा प्रत्यक्ष सल्ला घेण्याऐवजी गुगलवर जातात आणि आपल्याला दिसत असणारी लक्षणं कोणत्या आजाराची आहेत, हे गुगलला विचारतात. गुगल जे काही सांगेल तो आजार आपल्याला झाला आहे असं गृहित धरतात आणि नंतर सोशल मीडियाचा आधार घेतात. जे प्रत्यक्ष डॉक्टरकडे जाऊन आलेले आहेत आणि त्यांना डॉक्टरांनी जे काय सांगितलं असेल, त्यांनी ज्या काही गोळ्या, औषधं लिहून दिली असतात, ती गुगलवर चेक करतात. त्यात काय कंटेन्ट आहे ते पाहातात, त्याचे काय काय दुष्परिणाम आहेत हे शोधतात आणि आपणच आपले डॉक्टर होतात.
बरीचशी तरुण मुलं तर याच्याही पुढे गेलेली आहेत. कारण, ही मुलं आपला बहुतांश वेळ सोशल मीडियावर घालवतात. तिथे तर स्वत:ला जागतिक तज्ज्ञ समजणाऱ्या स्वयंघोषित विशेषज्ञांची काहीच कमतरता नाही. शिवाय हे तज्ज्ञ म्हणजे सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर्स! त्यांचा तर तरुणाईवर अधिकच प्रभाव. त्यामुळे ते जे काही सांगतील ते ही मुलं अगदी मुकाट ऐकतात आणि ते जे सांगतील ते करतात. आजकाल हे स्वयंघोषित तज्ज्ञ सोशल मीडियावरून मानसिक आजारांची लक्षणं काय असतात, त्यामुळे तुम्हाला काय होऊ शकतं, त्यासाठी काय केलं पाहिजे.. याबाबतची माहिती, व्हिडिओ, रिल्स शेअर करत असतात. त्यातली थोडी जरी लक्षणं स्वत:शी मिळतीजुळती असली तरी ही तरुण मुलं स्वत:ला आजारी समजायला लागतात. अर्थातच या इन्फ्लुएन्सर्सकडे त्यावरचे जालीम, रामबाण उपायही असातातच. आपला आजार कोणाला कळू नये आणि आजार तर बरा व्हावा म्हणून ही मुलं मग त्या इन्फ्लुएन्सर्सच्याच अर्धवट आणि चुकीच्या माहितीची री ओढत राहतात. वास्तव असं की त्यामुळे जी मुलं मानसिकदृष्ट्या आजारी नाहीत, तीही आजारी पडू लागली आहेत आणि जी खरोखरच आजारी आहेत, त्यांना योग्य ते उपचार मिळणं कठीण झालं आहे.
अमेरिकेत तर अशा स्वयंघोषित तज्ज्ञांची आणि त्यांच्याकडून उपचार करून घेणाऱ्या तरुण पेशंट्सची अक्षरश: लाट आली आहे. अर्थातच भारतातही यापेक्षा वेगळी स्थिती नाही. बरीच तरुण पिढी या अर्धशहाण्यांच्या नादी लागली आहे. या इन्फ्लुएन्सर्सपासून तरुण पिढीला कसं वाचवावं याची विवंचना जगभरातल्या तज्ज्ञांना लागली आहे.
अमेरिकेच्या मनोविकारतज्ज्ञ एनी बार्क यासंदर्भात सांगतात, बऱ्याचदा तरुण मुलं मानसिकदृष्ट्या आजारी नसतातच; पण हे इन्फ्लुएन्सर्स त्यांनी बळजबरी आजारी करतात आणि तरुणांनाही त्याचं मानसिकतेनं घेरलं जातं. या तरुण मुलांवर उपचार करण्यापेक्षाही त्यांना या इन्फ्लुएन्सर्सच्या जाळ्यातून कसं सोडवावं हा आमच्या पुढचा सर्वांत मोठा प्रश्न आहे. कारण, तज्ज्ञांच्या सल्ल्यापेक्षाही तरुण याच लोकांवर जास्त भरवसा ठेवतात आणि स्वत:च स्वत:च्या आयुष्याचं नुकसान करून घेतात.
प्रत्यक्षात वस्तुस्थिती अशी असते, कोणत्याही दोन जणांमध्ये सारखीच लक्षणं दिसत असली तरीही त्यातला एक आजारी असू शकतो, तर दुसरा अगदी ठणठणीत. त्या व्यक्तीचं वय किती आहे, यावरही बऱ्याचदा त्याला खरोखर आजार आहे की नाही, हे अवलंबून असू शकतं.
शिवाय सोशल मीडिया आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सचं वैशिष्ट्य म्हणजे जगातल्या कुठल्याही प्रश्नाचं ठामठोक आणि ‘रामबाण’ उपाय इथे छातीवर हात ठेवून एकदम खात्रीनं सांगितले जातात. त्याला कोणीच ‘चॅलेंज’ करू शकत नाही, असाही त्यांचा दावा असतो. त्यासाठी एक से बढकर एक उदाहरणंही ते इतरांच्या तोंडावर फेकतात. अर्थातच त्याला कोणताही वैद्यकीय आणि शास्त्रीय आधार नसतो; पण अशा लोकांचं तोंड धरणार कोण आणि त्यांना आवरणार कोण? त्यांना आळा घालणं अजून तरी जगातल्या कोणत्याही सरकारला शक्य झालेलं नाही. पुन्हा यातली गंमत अशी की, फेसबुक, इन्स्टाग्रामपासून ते टिकटॉकपर्यंत कोणत्याही सोशल मीडियाचं अल्गोरिदमच असं आहे, की तुम्ही जे सर्च कराल, तेच सातत्यानं तुमच्या नजरेसमोर येत राहील. या प्रकारानंच तरुणाईला ‘वेडं’ केलं आहे.
१०० व्हिडिओ १०० कोटी वेळा पाहिले! सोशल मीडिया आणि आरोग्यतज्ज्ञ डॉ. प्रिन्स्टन यांचं यासंदर्भात म्हणणं आहे, घरातल्या मोठ्या लोकांनाही आपल्या मुलांचं ऐकून घेण्यासाठी वेळ नाही. मार्च २०२२मध्ये झालेल्या एका सर्वेक्षणात तर आढळून आलं की, ‘मेंटल हेल्थ’ या हॅशटॅगखाली टाकण्यात आलेले शंभर व्हिडिओ तब्बल शंभर कोटीपेक्षा जास्त वेळा पाहिले गेले. आता बोला!