फोन नेमका केव्हा चार्जिंगसाठी लावायला हवा? हे फार थोड्या लोकांना माहिती असेल. अनेक लोक तर वारंवार फोन चार्जिंगला लावताना दिसून येतात. मात्र असे करणे योग्य नाही. खरे तर फोनची आवश्यकता एवढी वाढली आहे की, तो नेहमीच फूल चार्ज असावा, असे लोकांना वाटते. यामुळे काही लोक तर, बॅटरी थोडी जरी कमी झाली, तरी फोन चार्जला लावतात. पण असे करणे योग्य आहे का? तर उत्तर आहे नाही. तर, फोनची बॅटरी किती टक्क्यांवर आली की फोन चार्जिंगला लावायला हवा? जाणून घ्या...
फोनची बॅटरी चांगल्या स्थितीत ठेवण्यासाठी सर्वात चांगली पद्धत म्हणजे, फोन 20% वर आला की चार्जला लावावा आणि 80-90% पर्यंतच चार्ज करावा. जर आपण फास्ट चार्जिंगचा वापर करत असाल तर हे विशेषत्वाने महत्वाचे आहे. कारण 0% पासून चार्ज केल्याने बॅटरी खूप अधिक गरम होते आणि 80% हून अधिक, फास्ट चार्जिंग कमी कार्यक्षम होते.
खरे तर, बॅटरी ओव्हरचार्ज करण्यात कसल्याही प्रकारचा धोका नाही. आजकाल बहुतेक फोनमध्ये बॅटरीच्या हेल्थसाठी अनेक इन-बिल्ट फीचर्स असतात. जसे की, फोन 0% पर्यंत पोहोचण्यापूर्वीच बंद करणे. जर आपण आपला फोन अधिक काळ न वापरण्याचा विचार करत असाल तर, तो अर्धा चार्ज करणे हा एक उत्तम पर्याय आहे. महत्वाचे म्हणजे, दर सहा महिन्यांनी फोन चालू करण्याचा आणि बॅटरी सुरक्षित ठेवण्यासाठी 50% पर्यंत चार्ज करण्याचा सल्ला Apple कडून दिला जातो.
याशिवाय, लोकल स्वस्तातले चार्जर हे फोन आणि यूजर दोहोंसाठीही असुरक्षित असते. कारण यात कंपोनन्ट व्यवस्थितपणे इंस्युलेट केलेले नसतात. यामुळे शॉर्ट सर्किट आणि आग लागण्याचा धोकाही वाढतो.