व्हर्लपूल कंपनीने भारतात वाय-फाय कनेक्टीव्हिटी असणाया एयर कंडिशनर्सची मालिका सादर केली असून हे मॉडेल युजर्स आपल्या स्मार्टफोनवरून नियंत्रीत करू शकणार आहे. भारतात आधीच एयर कंडिशनर्सच्या बाजारपेठेत प्रचंड तेजी आहे. यातच आता कडाक्याचा उन्हाळा असल्यामुळे विविध कंपन्यांनी आपापले मॉडेल्स सादर करण्याचा सपाटा लावला आहे. तसेच अत्यंत स्पर्धात्मक अशा वातावरणात ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी विविध सुविधांचा वापर केला जात आहे. या अनुषंगाने व्हर्लपूल कंपनीने आपल्या एयर कंडिशनर्सच्या नवीन मालिकेत वाय-फाय कनेक्टीव्हिटी दिली आहे. या मालिकेत १ आणि १.५ टन क्षमतांचे मॉडेल्स लाँच करण्यात आले असून या सर्वांमध्ये ही सुविधा आहे. यासाठी व्हर्लपूलने खास स्मार्टफोन अॅप्लीकेशन विकसित केले असून ते अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही प्रणालींसाठी सादर करण्यात आले आहे. एयर कंडिशनर असणार्या भागात असलेल्या वाय-फाय नेटवर्कवरून या अॅपच्या मदतीने स्मार्टफोनवरून नियंत्रण करता येते. अर्थात स्मार्टफोन हाच यासाठी रिमोट कंट्रोलचे काम करतो. या माध्यमातून संबंधीत व्यक्ती जगाच्या कोणत्याही कोपर्यात असतांना आपल्या एयर कंडिशनरला चालू-बंद करण्यासह याच्या विविध सेटींगमध्ये बदल करू शकतो. तसेच या अॅपवर संबंधीत एयर कंडिशनर नेमक्या किती विजेचा वापर करतेय? याची अचूक माहितीदेखील मिळू शकते.
व्हर्लपूलचे हे नवीन एयर कंडिशनर्स इन्व्हर्टर या प्रणालीवर आधारित असून यामुळे यात विजेची मोठ्या प्रमाणात बचत होत असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. यामध्ये ‘थ्रीडी कुल’ या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला आहे. यामध्ये तीन व्हेंट देण्यात आले असून ते या मॉडेलच्या परिसरातील गरम हवा ही ४० टक्के अधिक वेगाने बाहेर फेकण्यास सक्षम आहेत. विशेष बाब म्हणजे अगदी ५५ अंश सेल्सियसच्या तापमानातील परिसरालाही वेगाने थंड करण्याची क्षमता या मॉडेल्समध्ये असण्याचा दावा कंपनीने केला आहे. याच्या विविध व्हेरियंटचे मूल्य ४३ ते ५९ हजारांच्या दरम्यान असून ते देशभरातील शॉपीजमधून ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले आहेत.