भारतातील मोबाईल क्रमांक किंवा फोन नंबर हे +91 ने सुरु होतात. आपल्याला अनेकदा अन्य क्रमांकावरून येणारे इतर देशांतील फोन कॉल उचलू नका, असे सांगितले जाते. कारण ते फ्रॉड असतात. भारतीयांना फसविण्यासाठी केले जातात. हा फोन कोणत्या देशातून आला होता हे तुम्हाला या पहिल्या दोन आकड्यांवरून समजू शकणार आहे.
भारतातून फोन येतोय हे +91 या आकड्यावरून समजते. भारतातील दूरध्वनी क्रमांक 2003 च्या राष्ट्रीय क्रमांकन योजनेअंतर्गत भारत सरकारच्या दूरसंचार विभागाद्वारे प्रकाशित केले जातात. भारतातही कोणत्या राज्यातून किंवा शहरातून, जिल्ह्यातून लँडलाईनवरून फोन येतोय हे त्याच्या पुढील कोडवरून समजत होते. जसे की पुणे ०२०, मुंबई ०२२ असे नंबर होते.
भारतातील शेवटचे कोड क्रमांक अद्ययावत करण्याचे काम २०१५ मध्ये झाले होते. आता लँडलाईन बंद पडत आल्या आहेत. यामुळे हे कोड हळूहळू लोप पावत जातील. कॉलसेंटर, कंपन्या सोडल्या तर अन्य कुणाकडेच लँडलाईन राहणे कठीण दिसत आहे.
तुम्हाला माहिती आहे का, भारताला मिळालेला +९१ हा क्रमांक कधी मिळाला होता? भारताला हा क्रमांक १९६० मध्ये मिळाला होता. आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाने भारताला हा कोड दिला होता. तेव्हापासून भारतातून फोन आला हे या क्रमांकावरून जगभरात ओळखले जात आहे.
यामागचे कारण असे आहे की, CCITT ब्लू बुकच्या झोन नंबर ९ मध्ये भारताला ठेवण्यात आले आहे. जगाची ही यादी नऊ झोनमध्ये विभागण्यात आली आहे. यानुसार भारताला ९ झोनमध्ये पहिला क्रमांक देण्यात आला आहे. म्हणून भारताचा कोड हा ९१ आहे.