लॉक डाउन आणि वर्क फ्रॉम होममुळे जगभरात वाय-फायची गरज आणि प्रसार दोन्ही वाढले आहेत. नेटवर्क कनेक्टिव्हिटीसाठी वाय-फायवर अवलंबुन असलेल्या डिवाइसेसची संख्या देखील वाढली आहे. कनेक्टिविटी जरी चांगली असली तरी वाय-फायची रेंज मात्र मर्यादित असते. परंतु लवकरच एक नवीन वाय-फाय टेक्नॉलॉजी बाजारात येणार आहे, जी या नेटवर्कची रेंज कित्येक पटीने वाढवेल.
वाय-फाय अलायन्स एका नवीन वाय-फाय टेक्नॉलॉजीवर काम करत आहे. जी Wi-Fi HaLow नावाने बाजारात येईल, अशी माहिती बिजनेस इन्सायडरने दिली आहे. ही नवीन टेक्नॉलॉजी नेटवर्कची रेंज 1 किमी पर्यंत वाढवू शकते. या टेक्नॉलॉजीचा सर्वाधिक फायदा इंटरनेट ऑफ थिंग्स (IoT) ला होईल. त्यामुळे शेती, उद्योग, स्मार्ट रेसिडन्स आणि स्मार्ट शहरांना जास्त होईल.
Wi-Fi HaLow म्हणजे काय?
वाय-फाय अलायन्सनुसार सध्या उपलब्ध असलेली वाय-फाय टेक्नॉलॉजी बँडविड्थच्या बाबतीत 2.4Ghz ते 5Ghz स्पेक्ट्रमवर चालते. नवीन वाय-फाय हॅलो 1Ghz पेक्षा कमी स्पेक्ट्रमचा वापर करेल. त्यामुळे विजेचा वापर देखील कमी होईल. परंतु लो फ्रिक्वेंसीमुळे रेंज वाढेल आणि दूरवर देखील डेटा ट्रांसमिट करता येईल.
लो फ्रिक्वेंसीचा वापर केल्यामुळे या नेटवर्कचा स्पीड मात्र खूप कमी असेल. या स्पीडवर IoT डिवाइसेस आणि प्रोडक्ट्स वापरता येतील. ज्यात स्मार्ट फ्रिज, स्मार्ट एसी इत्यादी डिवाइसेसचा समावेश असेल. वाय-फाय अलायन्सवरून मिळालेल्या माहितीनुसार पुढील वर्षी ही टेक्नलॉजी बाजारात उपलब्ध होऊ शकते.