मैत्री नावाच्या नाण्याच्या शेअरिंग आणि केअरिंग या दोन बाजू आहेत . मैत्री म्हणजे सुखात शेअरिंग तर दुःखात केअरिंग असा अनुभव आपण नेहमीच घेतो . आता या शेअरिंग मध्ये काळानुरूप बदल होत गेले . पूर्वी मैत्रीत रूम शेअरिंग ,पुस्तक शेअरिंग ,वस्तूंचे शेअरिंग ,चहाच्या टपरीवर कटिंग चे शेअरिंग एवढेच काय तर एकमेकांचे कपड्यांचे देखील शेअरिंग होत असे .आता मात्र या टेक्नोसॅव्ही जमान्यात इंटरनेट शेअरिंग हा एक फंडा पुढे आला आहे. 'यार तेरा हॉटस्पॉट ऑन कर ,मेरा नेट पॅक खतम हो गया 'हे वाक्य कट्ट्या कट्ट्या वर सर्रास ऐकायला मिळते . यारीदोस्तीतलं शेअरिंग वाढवणारा एक नवा फंडा नेट शेअरिंग.
पण हे वायफाय हॉटस्पॉट तंत्रज्ञान आहे तरी काय की ज्यामुळे हे इंटरनेट शेअरिंग अगदी सोपे झालंय ! अॅण्ड्राईड स्मार्टफोनवर इंटरनेट शेअर (टिथरिंग)करण्याच्या तीन वेगळ्यावेगळ्या पध्यती आहेत.युएसबी टिथरिंग,वाय-फाय टिथरिंग आणि तिसरी पद्धत म्हणजे ब्लुटुथ टिथरिंग. हे अगदी सोपं आहे. त्यात अवघड काही नाही, अनेकांना उगीच आपल्याला ते जमणार नाही असं वाटतं. पण त्यात क्लिष्ट आणि न जमण्यासारखं काहीच नाही !
इंटरनेट शेअरिंग च्या तीन प्रमुख पद्धती :
1.युएसबी टिथरिंग-
युएसबी टिथरिंग हा अॅण्ड्राईड स्मार्टफोनचा वापर करुन इंटरनेट शेअर करण्याचा सगळ्यात सोपा आणि फास्ट इंटरनेट स्पीड देणारा प्रकार आहे. यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी डाऊन होण्याची अजिबात शक्यता नसते कारण ज्या लॅपटॉपला किंवा पिसिला स्मार्टफोन जोडता त्यावेळी तुमचा स्मार्टफोनसुद्धा चार्जिंग होत असतो. डायरेक्ट कनेक्शन असल्यामुळे इंटरनेटचा स्पीड सुद्धा चांगला मिळतो. मात्र यामध्ये तुम्ही एकाच डिव्हाईस सोबत इंटरनेट शेअर करु शकता. यासाठी तुम्हाला युसबी डेटा केबल च्या सहाय्याने तुमचा स्मार्टफोन लॅपटॉपला जोडावा लागेल.त्यानंतर अॅण्ड्राईड स्मार्टफोनच्या सेटिंग मध्ये जाऊन वायरलेस आणि नेटवर्क मध्ये मोअर सेटिंग मध्ये जावे लागते. नंतर टिथरिंग आणि पोर्टेबल हॉटस्पॉट वर टॅप करावं लागतं.यामध्ये युएसबी टिथरिंग ला सिलेक्ट केलं की लॅपटॉप वर इंटरनेट सुरु.
2.वाय-फाय टिथरिंग
इंटरनेट स्पीडच्या बाबतीत वाय-फाय टिथरिंग दुसऱ्या क्रमांकावर येतं. याचा इंटरनेट स्पीड युएसबी टिथरिंग पेक्षा थोडा कमी असतो. वाय-फाय टिथरिंग या इंटरनेट शेअरिंग प्रकारामध्ये तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी जास्त लवकर डाऊन होते. मात्र वाय-फाय टिथरिंगचा सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे या इंटरनेट शेअरिंग प्रकारामध्ये तुम्ही एकापेक्षा जास्त डिव्हाईसवर इंटरनेट वापरु शकता. यासाठी तुम्हाला अॅण्ड्राईड स्मार्टफोनच्या सेटिंग मध्ये जाऊन वायरलेस आणि नेटवर्क मध्ये मोअर सेटिंग मध्ये जावे लागेल.नंतर टिथरिंग आणि पोर्टेबल हॉटस्पॉट वर टॅप करावे लागेल . आता हेच नेटवर्क आणि पासवर्ड वापरुन तुम्ही इतर डिव्हाईसवर इंटरनेट वापरायला देऊ शकता.
3.ब्लुटुथ टिथरिंग
हा इंटरनेट स्पीडच्या बाबतीत सगळ्यात स्लो प्रकार आहे.मात्र यामध्ये सुद्धा तुमच्या स्मार्टफोन ची बॅटरी खुप कमी वापरली जाते.शिवाय ब्लुटुथ टिथरिंग वापरुन जुन्या डिव्हाईसवर इंटरनेट वापरु शकता. ही गाणी किंवा पिक्चर शेअरिंगची सगळ्यात जुनी पद्धत. अर्थात अजूनही ही पद्धत काम करतेच.