‘क्लाउड सीडिंग’ अर्थात ‘कृत्रिम पाऊस’. म्हणजे ‘तंत्रज्ञानाच्या मदतीने कृत्रिम पाऊस पाडला जातो’. देशाच्या एखाद्या भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता झाली की, ह्या तंत्रज्ञानाच्या वापराबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा व्हायला लागतात. मात्र आजही आपल्या देशाने ह्या तंत्रज्ञावरती म्हणावी तशी हुकमत प्राप्त केलेली नाही.
विमान वा आर्टिलरी गनच्या मदतीने ह्या ढगांवरती सिल्व्हर आयोडाइड आणि कोरड्या बर्फाचा मारा केला जातो आणि पाऊस पडण्यासाठी आवश्यक त्या हवामानाची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला जातो. चीनने यात चांगलीच आघाडी घेतली आहे. जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये बीजिंगची गणना होते. बरेचदा तर सूर्यप्रकाशदेखील जमिनीवरती पोहोचत नाही. मात्र जेव्हा जेव्हा ह्या शहरात एखादा जागतिक इव्हेंट असतो, तेव्हा तेव्हा मात्र बीजिंगचे हवामान जादू व्हावी तसे बदलून जाते.
आकाश एकदम निरभ्र आणि स्वच्छ बनते. ह्यामागे जादू नसते, तर असते चीनचे हवामानात बदल करण्याचे तंत्रज्ञान. ह्या तंत्रज्ञानाचा वापर करून चीन एका विशिष्ट क्षेत्राच्या हवामानात आपल्याला हवा तसा बदल घडवून आणतो. चिंतेची गोष्ट ही की, बीजिंगपुरत्या मर्यादित असलेल्या ह्या तंत्रज्ञानाचा प्रयोग आता देशभर करण्याचे चीनने ठरविले आहे. चीनचे एकूण क्षेत्रफळ, त्याच्या विविध देशांशी जोडल्या गेलेल्या सीमा बघता, ह्या प्रयोगाचे परिणाम अनेक देशांवरती होण्याचा धोका निर्माण झाला आहे. चीन ह्या तंत्रज्ञानाचा वापर करून शेजारच्या भारतातील अनेक भागांत दुष्काळी परिस्थिती निर्माण करू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
सध्या चीनने २०२५ सालापर्यंत आपल्या ५५ लाख वर्गकिमी भागासाठी कृत्रिम पाऊस व बर्फ बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हा भाग एकूण चीनच्या ६०% तर भारताच्या आकारमानाच्या दीडपट मोठा आहे. चीन ह्या ‘क्लाउड सीडिंग’च्या मदतीने देशाच्या अनेक भागांमध्ये पाऊस पाडण्यासाठी प्रयत्न करणार आहे. असे करण्यात चीनला यश आल्यास, एकूणच हवामानात अत्यंत विचित्र बदल घडून, चीनच्या शेजारील अनेक देशांमध्ये पाऊसच न पडण्याचा धोका उत्पन्न होणार आहे. तैवान युनिव्हर्सिटीच्या तज्ज्ञांच्या मते तर, चीन ह्या तंत्रज्ञानाचा वापर करून शेजारील देशांचा पाऊसच पळवण्याचा प्रयत्न करण्याच्या तयारीत आहे.