चीनची आघाडीची इलेक्ट्रॉनिक कंपनी बनलेल्या वनप्लस आणि रिअलमी यांनी भारतात टीव्हींचे उत्पादन आणि विक्री दोन्ही अचानक बंद केली आहे. दोन्ही कंपन्यांनी भारतीय बाजारपेठेत चांगले स्थान मिळविलेले होते. मात्र, अचानक भारतीय बाजारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने खळबळ उडाली आहे. याचा फायदा आता टीव्ही बिझनेसमध्ये नंबर वन असलेल्या शाओमीला होणार आहे.
वनप्लस आणि रिअलमी या कंपन्या स्मार्टफोन बाजारात राहणार आहेत. टीव्हीच्या विक्रीत वाढ झालेली असताना दोन्ही कंपन्यांनी टीव्ही बिझनेस का सोडला असा सवाल उपस्थित होत आहे. या कंपन्यांनी भारतात टीव्ही विक्री चॅनेल आणि ब्रँडिंगमध्ये गुंतवणूक केली होती. इंटरनेटच्या तेजीमुळे आणि डेटाच्या किमती कमी झाल्यामुळे देशातील स्मार्ट टीव्ही मार्केटला अलीकडेच वेग आला आहे. तसेच ओटीटी प्लॅटफ़ॉर्मचा बिझनेसही वाढल्याने या टीव्हींना चांगली मागणी होती.
क्रिकेट विश्वचषकामुळे देशात टीव्हीच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. त्यातच फेस्टिव्ह सिझन असल्याने कंपन्या दणकून ऑफर्स देत आहेत. अशावेळीच या कंपन्यांनी टीव्ही मार्केटपासून दूर जाण्याचा निर्णय़ घेतला आहे. महागाईचा परिणाम टीव्हीसह सर्वच वस्तूंच्या किंमतीवर झाला आहे.
या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत देशातील डीलर्सना ४५ लाख टीव्ही पाठवण्यात आले आहेत. हा आकडा गेल्या वर्षीच्या तुलनेत आठ टक्क्यांनी जास्त आहे. टीव्ही विक्रीतील ऑनलाइन विक्रीचा हिस्सा 39 टक्क्यांवर पोहोचला आहे. Xiaomi, OnePlus, Realme, TCL आणि iFalcon या चिनी कंपन्या आहेत. या कंपन्यांनी एलजी, सॅमसंग आणि सोनी पेक्षा 30 ते 50 टक्के स्वस्त टीव्ही लाँच केले होते. यामुळे त्यांना जास्त प्रमाणावर पाय रोवता आले होते.