मुंबई - सिरीन लॅब्जने विविध उपकरणांच्या निर्मितीत अग्रेसर असणार्या फॉक्सकॉन या कंपनीसोबत ब्लॉकचेन या तंत्रज्ञानावर आधारित जगातील पहिला स्मार्टफोन तयार करण्याचे जाहीर केले आहे. जगभरात सध्या ब्लॉकचेन हे तंत्रज्ञान सर्वांच्या औत्सुक्याचा केंद्रबिंदू बनले आहे. याच्या माध्यमातून अतिशय सुरक्षित तसेच डिजीटल करन्सीजच्या सुलभ देवाण-घेवाणीची सुविधा असणारी विविध उपकरणे आणि प्रणाली विकसित करणे सोपे झाले आहे. नेमक्या याच तंत्रज्ञानाने सज्ज असणारा फिन्नी हा स्मार्टफोन सादर करण्याची तयारी या क्षेत्रातील ख्यातप्राप्त नाव असणार्या सिरीन लॅब्जने केली आहे. ब्यासाठी फॉक्सकॉनसोबत करार करण्यात आला आहे. फॉक्सकॉन ही मूळची तैवानमधील कंपनी अॅपलच्या आयफोनसह जगातील अनेक विख्यात ब्रँडचे उत्पादन करते. विविध देशांमध्ये या कंपनीचे युनिटस् आहेत. या पार्श्वभूमिवर, सिरीन लॅब्जचे तंत्रज्ञान आणि फॉक्सकॉनचे उत्पादन कौशल्य याच्या संगमातून लवकरच ब्लॉकचेन या तंत्रज्ञानावर आधारित स्मार्टफोन सादर करण्यात येणार आहे. फिन्नी या स्मार्टफोनमध्ये ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला असेल. यामुळे यातील माहिती ही अतिशय सुरक्षित असेल. याशिवाय या स्मार्टफोनवरून विविध डिजीटल करन्सीजचा वापर करणार्या शॉपींग संकेतस्थळावरून सुलभ खरेदी करता येईल. प्रत्यक्षातील चलनाला डिजीटल चलनात परिवर्तीत करण्याची सोय यात असेल. यासाठी विविध टोकन्सचा वापर करण्यात येणार आहे. यात बीटकॉईन्ससारख्या डिजीटल करन्सीजचा सुलभ संग्रह करता येणार आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे सध्या क्रिप्टो करन्सीजला आयरिस स्कॅन, फिंगरप्रिंट स्कॅन अथवा अगदी अक्षरांमधील पासवर्डच्या सहाय्याने वापरण्याची सुविधा या स्मार्टफोनमध्ये असेल. हे मॉडेल सिरीन ओएस या प्रणालीवर चालणारे असेल. आपले हे तंत्रज्ञान व ऑपरेटींग सिस्टीम अन्य कंपन्यांना देण्याची तयारीदेखील सिरीन लॅब्जने केली आहे. यामुळे लवकरच अन्य कंपन्यांचेही ब्लॉकचेन या तंत्रज्ञानावर आधारित स्मार्टफोन बाजारपेठेत दाखल होतील अशी शक्यता आहे. आभासी चलन वापरणार्यांसाठी हा स्मार्टफोन अतिशय सुरक्षित पर्याय बनणार आहे. यामुळे याच कम्युनिटीला समोर ठेवून हे मॉडेल विकसित करण्यात आले आहे.
आगामी ऑक्टोबर महिन्यात फिन्नी स्मार्टफोन सादर करण्यात येणार आहे. याचे मूल्य ९९९ डॉलर्स (अंदाजे ६४,९४२ रूपये) असून अगावू नोंदणी करणार्यांना हे मॉडेल ८९९ डॉलर्समध्ये (सुमारे ५८,४४३ रूपये) मिळणार आहे. सिरीन लॅब्जच्या संकेतस्थळावरून (https://sirinlabs.com) याची अगावू नोंदणी सुरू करण्यात आली आहे.
पहा: फिन्नी स्मार्टफोनची माहिती देणारा व्हिडीओ.