मायक्रोसॉफ्टने विकसित केलेल्या विंडोज या ऑपरेटींग सिस्टीमवर आधारित स्मार्टफोन आता काळाच्या पडद्याआड गेले असून याची विक्री थांबविण्यात आली आहे.
मायक्रोसॉफ्टने आधीच विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमवर चालणार्या स्मार्टफोनची निर्मिती बंद केली होती. यानंतर याचा सपोर्टदेखील काढण्यात येणार असल्याचे जाहीर झाले होते. अर्थात असे असले तरी मायक्रोसॉफ्टकडे विंडोज प्रणालीवर चालणार्या स्मार्टफोनचा थोडा स्टॉक शिल्लक होता. आता हे सर्व मॉडेल्स विकले गेले असून विंडोज स्मार्टफोन हा खर्या अर्थाने इतिहासजमा झाला आहे.
मायक्रोसॉफ्टच्या विंडोज प्रणालीने केल्या अनेक दशकांपासून संगणक क्षेत्रात अग्रगण्य ऑपरेटींग सिस्टीम म्हणून आपला लौकीक कायम राखला आहे. संगणकासह लॅपटॉप आणि टॅबलेटमध्येही ही प्रणाली लोकप्रिय झाली आहे. तथापि, स्मार्टफोनमध्ये विंडोज प्रणालीस प्रचंड अपयश आले. खरं तर आयओएस आणि अँड्रॉइड अस्तित्वात येण्याआधीपासूनच विंडोज प्रणालीवर चालणारे मोबाईल हँडसेट बाजारपेठेत आले होते. मध्यंतरी नोकियाने यावर चालणारे अनेक मॉडेल्स सादर केल्यामुळे विंडोज फोनला लोकप्रियता लाभली होती. मात्र आयओएस आणि अँड्रॉइडच्या प्रचंड गतीसमोर विंडोज फोन टिकू शकले नाही. यातच आता यावर चालणारे स्मार्टफोन हे खर्या अर्थाने काळाच्या पडद्याआड गेले आहेत.