नवी दिल्ली - व्हॉट्सअॅप हे संवाद साधण्याचं अत्यंत प्रभावी माध्यम आहे. व्हॉट्सअॅपवर शब्दांऐवजी भावना व्यक्त करण्यासाठी इमोजीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. मजा, मस्करी, राग, प्रेम यांसारख्या कोणत्याही भावना व्यक्त करायच्या असल्यास इमोजीचा सर्रास वापर होतो. 17 जुलै रोजी जागतिक इमोजी दिवस साजरा केला जातो. आनंदाचे अश्रू येणारा आणि ब्लोईंग किस देणारा इमोजी अशा दोन इमोजीचा भारतात सर्वाधिक वापर होत असल्याची माहिती समोर आली आहे. सोशल मीडियावर चॅटिंग करताना हे इमोजी वापरले जातात.
जागतिक इमोजी दिनाच्या पूर्वसंध्येला टेक कंपनी 'बोबल एआय'ने एक रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. यामध्ये भारतीयांनी पसंती दिलेल्या दोन इमोजीबाबत माहिती देण्यात आली आहे. आनंदाश्रू आणि ब्लोईंग किस या दोन इमोजीचा भारतात सर्वाधिक वापर होतो. तर टॉप 10 इमोजींमध्ये स्माईलिंग फेस विथ हार्ट आइज, किस मार्क, ओके हँड, लाउडली क्राईंग फेस, बिमिंग फेस विथ स्माईलिंग आइज, थम्स अप, फोल्डेड हँड्स आणि स्माईलिंग विथ सनग्लासेस या इमोजीचा समावेश आहे.
व्हॉट्सअॅपवरही या इमोजी आहेत. सण आणि राष्ट्रीय उत्सवादरम्यान इमोटिकॉन्सचा वापर सर्वाधिक झाल्याचे रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. डेटिंग अॅपमध्ये आनंद व्यक्त करताना, फ्लर्टी आणि रोमांटिक इमोजीचा सर्वाधिक वापर होतो. बोबल एआयचे सहसंस्थापक अनित प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, इमोजी हळूहळू आपल्या डिजिटल संस्कृतीचा एक भाग झाले आहेत. संवाद साधण्याचा हा एक नवा मार्ग आहे. जगभरात पहिली इमोजी 'स्माईली' आहे. हसण्याने सुरुवात झालेल्या या इमोजींची क्रेझ प्रचंड वाढली आहे. त्यामुळेच आता केवळ स्माईलीपुरतीच इमोजी मर्यादीत राहिली नसून अनेक वेगवेगळ्या भावनांच्या इमोजी तयार झाल्या आहेत.
WhatsApp वरच्या चॅटिंगची गंमत वाढणार, 230 नवीन इमोजी येणार
व्हॉट्सअॅपवरच्या चॅटिंगची गंमत आणखी वाढणार आहे कारण इमोजीच्या लिस्टमध्ये 230 नवीन इमोजींचा लवकरच समावेश होणार आहे. युनिकोडने 2019 साठी नवीन 230 इमोजीची अधिकृत लिस्ट जाहीर केली आहे. व्हॉट्सअॅपवरील इमोजीच्या लिस्टमध्ये 59 नवीन इमोजीमध्ये 171 व्हेरिअंटचा समावेश आहे. या नवीन इमोजीमध्ये प्राणी, फळ, भाज्या, मेकॅनिकल आर्म, वेफल, आईस क्यूब, ब्लड ड्रॉप, बटर, रिक्षा अशा अनेक इमोजींचा समावेश आहे. नवीन इमोजीमध्ये व्हीलचेअरवर बसलेला माणूस, गाईड डॉगसारख्या नव्या इमोजींचा समावेश आहे. तसेच युनिकोडने काही नवीन रंगाची चिन्हंही प्रसिद्ध केली आहेत. यामध्ये ह्रदय, सर्कल आहे. यासोबतच युजर्सच्या मागणीनुसार सफेद ह्रदयाच्या चिन्हांचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे. हे इमोजी फायनल करण्यात आले असले तरी काही दिवसानंतर ते स्मार्टफोनमध्ये उपलब्ध होणार आहेत. नवीन इमोजी या वर्षाच्या सप्टेंबर किंवा ऑक्टोबरपर्यंत स्मार्टफोनमध्ये दिसण्याची शक्यता आहे.