सर्वेश देवरुखकर
आजच्या काळात आपण डिजिटल कॅमेरे म्हणजेच मोबाईल , डी.एस.एल.आर. , मिररलेस, ऍक्शनकॅम यांसारखे अत्याधुनिक यंत्रे फोटोग्राफीसाठी वापरतो.एकदा बटन दाबले कि १५/२० फोटो सहजच निघतात. ऑटो फोकस , ऑटो एक्स्पोजर , ISO , सीन डिटेक्शन , इलेक्ट्रॉनिक फ्लॅश , वेगवेगळ्या लेन्सेस या अत्याधुनिक योजनांमुळे फोटोग्राफी अतिशय सोपी झाली आहे. पुर्वीसारखे कॅमेऱ्यात फिल्म रोल घालणे प्रत्येक फ्लॅश ला बल्ब बदलणे. लाईटचा अभ्यास करून सेटिंग लावणे यांची डिजिटल कॅमेऱ्यात कटकट पण नाही आणि त्यांचा खर्च देखील नाही. एकदा कॅमेरा घेतला कि हवे तितके फोटो काढा आणि नको ते डिलीट करा म्हणजे झाले.परंतु हा फोटोग्राफीचा आजपर्यंतचा प्रवास खऱ्या अर्थाने १८१ वर्षांपूर्वी सुरु झाला.
१४ व्या शतकात यूरोपीय देशांमध्ये खगोलीय घटना तसेच ताऱ्यांचे निरीक्षण करण्याचे प्रमाण वाढू लागले. चंद्रग्रहण , सूर्यग्रहण , ताऱ्यांच्या सूक्ष्म हालचाली यांच्या नोंदी ठेवण्यास सुरवात झाली. ताऱ्यांच्या स्थितीवरून दिशेचा अंदाज लावणे हा त्यांचा प्रमुख उद्देश होता. पण सूर्यग्रहणासारख्या प्रखर प्रकाशीय घटना उघड्या डोळ्याने पाहता येणे शक्य नव्हते, त्यामुळे ग्रहणाचे प्रतिबिंब एका अंधाऱ्या खोलीत पाडून त्याचे निरिक्षण करण्यास सुरवात झाली. यातूनच कॅमेऱ्याच्या प्राथमिक स्वरूपाचा शोध लागला. एखाद्या बंद खोलीत एका बाजूला छोटसे छिद्र पडून बाहेरील प्रकाश आत येण्याची सोय केलेली असे खोलीत पूर्ण अंधार असल्यामुळे आणि लहान छिद्रामधून येणार प्रकाश कमी तीव्रतेचा असल्याने ग्रहणकाळात सूर्याची बदलणारी स्थिती उघड्या डोळ्याने पाहता येणे शक्य झाले. यालाच कॅमेरा अब्यास्कुरा म्हंटले जायचे.
१७ व्या शतकापर्यन्त यामध्ये बरेच संशोधन झाले व कॅमेरा अब्यास्कुराचा आकार लहान करून कोठेही नेतायेण्याजोगा करण्यात यश मिळाले.याच काळात जॉन हेनरिक शुलूझ या शास्त्रज्ञाने चांदीवर होणाऱ्या प्रकाशाचा परिणाम जगाला दाखवून दिला. त्याने पेन्सिल स्केचचे प्रतिबिंब एका वेगळ्या कागदावर हुबेहूब उमटवण्याचा प्रयत्न केला. १९ व्या शतकापर्यंत यातील शोध सुरूच राहिले. १८१९ साली सर जॉन हर्शेल यांनी सोडियम थायोसल्फेट या रसायनाचा शोध लावला ज्यामुळे चांदीच्या कणांवर निर्माण झालेली प्रतिमा कायमस्वरूपी स्थिर करता येणे शक्य झाले. १८२६ साली निसोफर निऍप्स याने आठ तासांचा एक्स्पोजर देऊन जगातील पहिली स्थिर प्रतिमा तयार करण्यात यश मिळवले परंतु त्यामध्ये सुधारणा करण्यात तो अपयशी ठरला. पुढे लुई जॅक मांद दाग्येर या फ्रेंच शास्त्रज्ञ/चित्रकाराने चांदीच्या पत्र्यावर प्रतिमा घेण्याचे तंत्र अवगत केले आणि १९ ऑगस्ट १८३९ साली फ्रेंच सरकारच्या मदतीने त्याचे पेटंट सर्वांसाठी खुले केले यामुळे फोटोग्राफी जगभर पसरली. या त्याच्या कार्याच्या सन्मानार्थ १९ ऑगस्ट हा जागतिक छायाचित्र दिन म्हणून जगभर साजरा केला जातो.
(लेखक व्यावसायिक छायाचित्रकार, कॅमेरा संग्राहक आहेत) ९४०४७००७०४