इंटरनॅशनल डाटा कार्पोरेशन म्हणजेच आयडीसी या डाटा रिचर्समधील ख्यातप्राप्त संस्थेने या वर्षीच्या तिसर्या तिमाहीत ( जुलै ते सप्टेंबर) भारतीय बाजारपेठेत झालेल्या स्मार्टफोन विक्रीची आकडेवारी नुकतीच जाहीर केली आहे. यातून भारतीय ग्राहकांचा विविध ब्रँडबाबत असलेला कल स्पष्टपणे अधोरेखित झाला आहे. यातील सर्वात लक्षणीय बाब म्हणजे शाओमी कंपनीने अतिशय प्रचंड गतीने मारलेली मुसंडी हीच होय. गेल्या तीन महिन्यात भारतीय बाजारपेठेत सुमारे ३.९ कोटी स्मार्टफोनची विक्री झाली. यात प्रत्येकी २३.५ टक्क्यांचा वाटा सॅमसंग आणि शाओमी या कंपन्यांचा असल्याचे अधोरेखित झाले आहे.
शाओमीने आधीच गत तिमाहीत आपल्या कंपनीने भारतात ९२ कोटी स्मार्टफोन विकल्याचे जाहीर केले होते. यावर या आकडेवारीतून शिक्कामोर्तब झाले आहे. तर सॅमसंगनेही इतकेच स्मार्टफोन विकल्याचे यातून दिसून आले आहे. खरं तर, गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय स्मार्टफोनच्या बाजारपेठेत सॅमसंग पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. आता मात्र शाओमीही संयुक्तरित्या पहिल्या क्रमांकावर पोहचली आहे. अर्थात आता सॅमसंगच्या पहिल्या क्रमांकाला शाओमीच्या माध्यमातून पहिल्यांदाच तगडे आव्हान मिळाले आहे.
शाओमीच्या यशात रेडमी नोट 4 या मॉडेलचा सर्वाधीक वाटा आहे. गेल्या तीन महिन्यात या कंपनीने तब्बल ४० रेडमी नोट ४ हे हँडसेट विकले आहेत. याच्या जोडीला शाओमीने ऑनलाईन आणि ऑफलाईन मार्केटींग तंत्राचा मिलाफ केल्याचंही या कंपनीला लाभ झाल्याचे दिसून आले आहे. तर सॅमसंगचे गॅलेक्सची जे 2, जे 7 नेक्स्ट, जे 7 मॅक्स आदी मॉडेल्सला लोकप्रियता लाभली आहे.
गत तिमाहीत लेनोव्हो ही कंपनी (आपल्या मालकीच्या मोटा ब्रँडसह) तिसर्या क्रमांकावर आहे. तर चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर अनुक्रमे विवो आणि ओप्पो या कंपन्या असल्याचे आयडीसीने जाहीर केले आहे. म्हणजे पहिल्या पाच क्रमांकामध्ये दक्षिण कोरियातील सॅमसंगचा अपवाद वगळता अन्य सर्व कंपन्या चीनी आहेत. अर्थात यात एकही भारतीय कंपनीचा समावेश नसल्याची बाब लक्षणीय आहे.